नालासोपाऱ्यात गुन्हेगारांवर तिसऱ्या डोळ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:32 AM2020-12-14T00:32:39+5:302020-12-14T00:32:43+5:30
नालासोपारा पोलिसांनी त्यांच्या हद्दीमधील मुख्य नाक्यावर, गर्दीच्या ठिकाणी तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
नालासोपारा : पश्चिमेकडील नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर आता तिसऱ्या डोळ्याची करडी नजर राहणार आहे. नालासोपारा पोलिसांनी त्यांच्या हद्दीमधील मुख्य नाक्यावर, गर्दीच्या ठिकाणी तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात जनतेच्या सुरक्षेसाठी व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना म्हणून ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही संकल्पना नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आली आहे.
शहरात सर्वप्रथम माजी नगरसेविका सुषमा दिवेकर यांच्याकडून देण्यात आलेले पाटणकर पार्क येथील चार सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सिविक सेंटर येथे छाया विकमानी यांच्याकडून दुचाकी, चारचाकी गाड्यांचे नंबर प्लेट रीडिंग करणारे तीन सीसीटीव्ही कॅमेरे, एसटी डेपो वळणावर प्रकाश वझे व अगस्ती सावंत यांच्याकडून तीन कॅमेरे, लक्ष्मीबेन छेडा मार्ग येथे सरफराज हुसेन यांच्याकडून चार कॅमेरे, यशवंत गौरव रिक्षा स्टँडच्या येथे माजी नगरसेविका शुभांगी गायकवाड यांच्याकडून तीन कॅमेरे, रिद्धी विनायक हॉस्पिटल येथे डॉ. वेंकट गोयल यांच्याकडून तीन कॅमेरे, निळेगावातील माजी नगरसेवक किशोर पाटील यांच्याकडून वाघोबा मंदिर, तपस्या बिल्डिंग आणि गावदेवी मंदिर या तीन ठिकाणी एकूण आठ कॅमेरे लावले. नाळा गावातील डिसिल्वा नगर येथे राकेश मच्याडो यांच्याकडून तीन कॅमेरे असे एकूण ३० सीसीटीव्ही बसविण्यात आले.
नालासोपाऱ्यात पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते आणि सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या उपस्थितीत हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार यापुढेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करत असल्याचे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.