नाट्य परिषद करणार थर्ड पार्टी ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:46 PM2019-01-07T22:46:25+5:302019-01-07T22:47:01+5:30
निद्रिस्त शाखांसाठी प्रसाद कांबळीची मात्रा : मिरवणाऱ्या सदस्यांना संमेलनात प्रवेश नाही
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : राज्यभरातील निद्रिस्त असलेल्या मराठी नाट्य परिषदेच्या शाखांचे थर्ड पार्टी आॅडिट केले जाणार आहे. अनेक सदस्य केवळ मिरवण्याचे काम करून शाखा कार्यरत असल्याचे भासवतात. अशा सदस्यांना शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संमेलनास प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेतर्फे शनिवारी आदित्य मंंगल कार्यालयात ‘एक किमयागार एक संध्याकाळ’ हा कार्यक्रम झाला. यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत नाटककार आनंद म्हसवेकर यांनी घेतली. या कार्यक्रमाच्या शेवटी डोंबिवली शाखेला मार्गदर्शन करावे, असे आवाहन डोंबिवली नाट्य परिषदेच्या दीपाली काळे यांनी केले असता कांबळी बोलत होते.
कांबळी म्हणाले, ‘राज्यभरातील नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये समन्वय असला पाहिजे. आम्ही सगळेच केले. आम्हीच करतोय, अशा आविर्भावात राहू नये. मागे काय घडले, याचा विचार करण्यापेक्षा आता काय करणार आहोत. त्यात नावीन्य काय असेल, याचा विचार केला पाहिजे. शाखेतील सदस्यांनी एकमेकांच्या उकाळ्यापाकाळ्या काढू नयेत. काम करायचे नसल्यास सगळ्या सदस्यांनी राजीनामा देऊन नव्या काम करणाºया कार्यकारिणीची निवड करावी. नाट्य परिषदेच्या शाखा आणि संमेलनात कामापेक्षा मानापमानाचे प्रयोग खूप रंगतात. एखाद्या शाखेतील १५ सदस्य जीव तोडून काम करत असतील, तर एखाद्या शाखेतील १५० सदस्यांपैकी कोणीच उपयोगाचे नाही, असेही असू शकते. चांगले काम करणाºयांना काही मदत हवी असल्यास परिषदेतर्फे केली जाईल.’
‘नाट्य परिषदेच्या कामात, नाट्य चळवळी, नाट्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप नको. नाट्य परिषद, चळवळ, संमेलन या गोष्टी राजकारणविरहित असाव्यात. जात, धर्म आणि पंथांच्या पलीकडे विचार झाला पाहिजे. अनेकदा मुंबईचा अध्यक्ष नको, विदर्भातला नको, असे मुद्दे येतात. पण, ते महत्त्वाचे नाही. डोंबिवलीतील रसिकांना नाटके आवडतात. मात्र, रसिक नाट्य परिषदेशी तसेच नाट्य परिषद रंगकर्मीशी जोडलेली नसेल, तर त्यांना जोडण्याचे काम परिषदेच्या शाखेद्वारे झाले पाहिजे. एकांकिका स्पर्धा भरवणे, नाट्य चळवळ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शाखेतर्फे झाले पाहिजे. रंगभूमी जगवण्यासाठी शाखा उपयुक्त ठरल्या पाहिजे. त्या दिशेने त्यांचे काम असले पाहिजे’, असे आवाहन कांबळी यांनी केले. ‘डोंबिवलीत २००४ मध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होेते. भूतकाळात रमण्यापेक्षा पुढे आपण काय करणार आहोत, याचा विचार केला पाहिजे’ असेही कांबळी यांनी डोंबिवलीकरांना सांगितले.
दोन्ही अध्यक्षपदाचे मुकुट काटेरीच
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष काय किंवा नाट्य संमेलनाचा अध्यक्ष काय, हे दोन्ही मुकुट काटेरी आहेत. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांना विचारले जाते, वर्षभरात काय करणार? नाट्य जगतातील सगळ्यांचे लक्ष अध्यक्षांच्या भाषणाकडे असते. त्यामुळे ते महत्त्वाचे असते.
नागपूर येथे होऊ घातलेले ९९ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन यशस्वी करायचे आहे. खरी मजा शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला येणार आहे. त्या निमित्त राज्यभर कार्यक्रम करण्याचा मानस अखिल भारतीय नाट्य परिषदेचा असल्याची माहिती कांबळी यांनी दिली.