तेरावर्षीय प्रचीतीने केले १०० गड सर; तालुक्यात कौतुकाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:25 AM2021-02-08T01:25:57+5:302021-02-08T07:33:16+5:30

वसईतील मूळगाव- केरेपोंडे या गावात राहणारी प्रचीती दीपक म्हात्रे हिला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. जणू तिला वेडच आहे. ती उत्तम कबड्डीपटूदेखील आहे.

Thirteen year old Prachiti mhatre climbed 100 forts | तेरावर्षीय प्रचीतीने केले १०० गड सर; तालुक्यात कौतुकाचा विषय

तेरावर्षीय प्रचीतीने केले १०० गड सर; तालुक्यात कौतुकाचा विषय

Next

पारोळ : गिरिभ्रमण अर्थात ट्रेकिंग हा एक सर्वांगसुंदर छंद आहे. न‌िसर्गाची ओढ आणि इतिहासाची आवड, यामुळे वसईतील तेरा वर्षीय प्रचीती म्हात्रे ट्रेकिंगकडे कधी ओढली गेली, हे तिलाही कळले नाही. गेल्या चार वर्षांत तिने एक-दोन नव्हे, तर तब्बल १०० गडकोट पादाक्रांत केले आहेत. डिसेंबर महिन्यात तिने सिंहगड ते राजगड, असा नऊ तासांचा पायी प्रवास करत गडकोटांची शंभरी पार केल्याने तालुक्यात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वसईतील मूळगाव- केरेपोंडे या गावात राहणारी प्रचीती दीपक म्हात्रे हिला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. जणू तिला वेडच आहे. ती उत्तम कबड्डीपटूदेखील आहे. वसईतील कार्मलेट काॅन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलमध्ये ती आठव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अनेक गडकोटांची शृंखला दडलेली आहे, हे जेव्हा वसईतील मूळगावच्या या चिमुरडीला कळले, तेव्हा आई प्रगती आणि मोठी बहीण ध्रुवालीसोबत शाळा ते ट्यूशन या प्रवासात कबड्डीची प्रॅक्टिस आणि यातून वेळ काढून या जादूभरल्या वाटेवर ती हिंडायची.
 
गेल्या चार वर्षांत तिने शेकडो किल्ल्यांची भटकंती पूर्ण केली आहे. हे किल्ले पाहताना कष्टप्राय वाटा, मनाचा संयम आणि शारीरिक क्षमता या साऱ्यांशी हातमिळवणी करून अनेक ट्रेक केले. त्यात तोरणा, शिवनेरी, सारसगड, रायगड, साल्हेर सालोटा, मोरा मुल्हेर, हरगड किल्ल्यांची वारी, कोरीगड, 
घनगड, बाहुला गड, हडसर किल्ल्यावरच्या खुंट्याच्या वाटेने चढाई, अशा अनेक गड-किल्ल्यांचा समावेश आहे.

दुर्गभ्रमणामुळे निसर्गाच्या अधिक जवळ जायला मिळतेच आण‌ि त्याचबरोबर इतिहासही अनुभवता येतो. ट्रेकिंगने मला शिवाजी महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याचा आण‌ि पराक्रमाचा इतिहास जवळून पाहण्यास आण‌ि अनुभवण्यास मिळाला, हे मी माझे भाग्य समजते. २०१५ पासून शिवरायांच्या स्वराज्याचा कणा असलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील गडकोट पाहत असताना जे काही मानसिक समाधान मिळाले त्याची तुलना तर कशाशीही होऊ शकत नाही -प्रचीती म्हात्रे

Web Title: Thirteen year old Prachiti mhatre climbed 100 forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.