थर्टीफर्स्टवर पोलिसांची करडी नजर; दारूपार्ट्या, मद्यपी वाहनचालक रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 10:38 AM2021-12-27T10:38:28+5:302021-12-27T10:38:53+5:30
पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याला प्राधान्य देतात.
पालघर : पालघर जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जल्लोष होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांसह प्रशासन सतर्क झाले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या दारूपार्ट्यांवर नजर ठेवली जात आहे, तसेच ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
पालघर हा जिल्हा मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांबरोबरच शेजारच्या गुजरात राज्यालाही जवळचा आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला असल्याने बहुसंख्य पर्यटक समुद्रकिनारपट्टी भागांत भटकंती आणि रात्रीच्या वेळी दारूपार्ट्या करण्याला प्राधान्य देतात. या अनुषंगाने जिल्ह्यात बव्हंशी हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल झालेली आहेत.
थर्टीफर्स्टच्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे आणि त्यानंतर नवीन वर्षात सुरुवातीलाच शनिवार, रविवार, असा सुटीचा दिवस असल्यामुळे
सलग तीन दिवस मौजमस्तीसाठी मिळणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे विविध ठिकाणच्या नागरिकांचा ओढा असतो. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे कडक निर्बंध होते. मात्र, यावेळी निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता आहे. मात्र, आधीच झालेले बुकिंग लक्षात घेता अनेकांना गर्दी टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पोलिसांची तसेच प्रशासनाची असलेली करडी नजर पाहता व्यावसायिकांना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे.
पालघर जिल्हा हा समुद्रकिनारी भाग, तसेच निसर्गाने नटलेला आहे. यामुळे येथे पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मात्र, समुद्री पर्यटनाला पसंती देणाऱ्या ग्राहकांबरोबरच उपाहारगृहांनाही नवीन निर्बंध पाळावे लागणार आहेत. यामुळे ऐन हंगामात मंदीचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती आता व्यावसायिकांनी व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यातील हॉटेल आणि कृषी पर्यटन केंद्रांच्या ऑनलाइन बुकिंगला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे या व्यवसायाला या हंगामात झळाळी आल्याची चर्चा आहे.