‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:36 AM2021-04-14T05:36:02+5:302021-04-14T05:36:24+5:30
Vasai-Virar Municipal Corporation : आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
वसई : नालासोपारा येथील खासगी रुग्णालयातील १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचे स्पष्टीकरण वसई-विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री देण्यात आले आहे. आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
वसई विरार-शहर महानगरपालिका हद्दीतील रिद्धी विनायक हॉस्पिटल व विनायका हॉस्पिटल येथील सोमवारी झालेल्या कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्ट करताना महापालिकेने म्हटले आहे की, १२ एप्रिल रोजी विनायका हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये ७ व रिद्धीविनायक या खासगी रुग्णालयामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला असल्याची बातमी वस्तुस्थितीला अनुसरून नाही.
दरम्यान, विनायक हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयास लिओ ऑक्सिजन एजन्सी या ऑक्सिजन पुरवठादाराकडून ११ एप्रिल रोजी १३९ जम्बो सिलिंडर व १ Dura सिलिंडर असे १६६ जम्बो सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. अर्थातच एका जम्बो सिलिंडरमध्ये ७ हजार लिटर ऑक्सिजन असून, त्याप्रमाणे पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे.
नालासोपारास्थित रिद्धीविनायक हॉस्पिटल या खासगी कोविड रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठादाराकडून ११ एप्रिल रोजी ५० जम्बो सिलिंडर व १२ एप्रिल रोजी ६० असे एकूण ११० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेने स्वतःहून पुढाकार घेऊन १२ एप्रिल रोजी १० टन ऑक्सिजन प्राप्त करून घेतला असून, महानगरपालिकेची स्वतःची २ व इतर खासगी रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे, असेही वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.