रोजगार हमीचे तीन तेरा : पगार न मिळाल्याने बुरे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 02:24 AM2018-04-25T02:24:20+5:302018-04-25T02:24:20+5:30
तीन महिने झाली चणचण
मोखाडा : ‘मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम’ या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत तीन महिन्याचा कालावधी उलटत आला असतानाही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आदिवासी आंदोलनाचा सुर आळवित आहेत.
तालुक्यातील धामणशेत कोशिमशेत ग्रुप ग्रामपंचायती मधील धमानशेत येथिल १५० मजुरांनी फेब्रुवारी महिन्यात १२ दिवस कृषी विभाग यंत्रनेच्या मजगी (बांध) चे काम केले आहे परंतु बऱ्याच दिवसाचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. पैशाची चणचण व गरिबी येथे पाचवीला पुजलेली असल्याने रोजगार हमीच्या पैशांसाठी त्यांना तालुक्याला जाण्यासाठीही उसनवारी करावी लागत आहे. आणि ते करुनही सरकारी बाबू रित्या हातानी परत पाठवीत असल्याने आदिवासींच्या पदरी निराशा पडत आहे. याबाबत नायब तहसिलदार पी. जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.
आम्ही फेब्रुवारी महिन्या मध्ये कृषी विभागाच्या मजगीचे (बांध-बंधारा) काम केले आहे. परंतु तिसरा महीना संपत आला तरी आम्हाला मोबदला मिळालेला नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे
- भिका शिंदे-मजूर ( गाव धामणशेत)