पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:04 AM2020-03-31T01:04:39+5:302020-03-31T01:04:44+5:30
बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही.
बोर्डी : पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी सध्या गुजरातच्या विविध बंदरात अडकले असून तेथे खाण्या-पिण्याची आबाळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची काही ना काही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र तसेच गुजरात सरकारकडे केली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा बंद असल्याने त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीसह अन्य तालुक्यातील हजारो आदिवासी नागरिक हे गुजरात तसेच गोवा राज्यातील मासेमारी बोटीवर तांडेल आणि खलाशी म्हणून आॅगस्ट ते मे या मासेमारी हंगामासाठी स्थलांतरित होतात. या वर्षीच्या प्रारंभी मत्स्य दुष्काळामुळे हंगामाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बोट मालकांनी अनेकांना घरी पाठवले. तर शेवटची फिशिंग करून घरी येण्याच्या तयारीत असताना त्यांना कोरोनामुळे बंदरात जहाज नांगरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे जेटी, खाडी आणि किनाऱ्यालगत बोटी उभ्या कराव्या लागल्याची माहिती डहाणूतील तांडेल कमलेश माच्छी यांनी ‘लोकमत’ला दिली.
बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. तेथील प्रशासनाकडून खाण्या-पिण्याची सुविधा निर्माण केल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्या भागात त्याचे वाटप होते, याची त्यांना माहिती नाही. बोटमालकही पुरेसे लक्ष देत नसल्याने आबाळ होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यापासून ही बंदरे सुमारे ७५० ते ८०० कि.मी. लांब असल्याने चालत अंतर कापता येणे अशक्य असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करून जिल्हा तसेच राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या खलाशांचे लवकर घर गाठण्याचे स्वप्न भंगणार आहे. तर घरधन्याला माघारी बोलावण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून परतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खलाशांच्या कुटुंबियांकडूनही होत आहे.