वसईच्या सनसिटी मैदानात हजारो मजुरांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 02:25 AM2020-05-27T02:25:00+5:302020-05-27T02:25:19+5:30
सात श्रमिक ट्रेनमधून ११,२०० मजूर रवाना
वसई/पारोळ : वसई, विरार आणि नालासोपारा शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी सध्या शासनाकडून श्रमिक गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र या नागरिकांमुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी रात्री वसई रोड स्टेशनहून सात श्रमिक ट्रेन रवाना होणार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यासाठी मजुरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, सात श्रमिक ट्रेनमधून एकूण ११,२०० मजूर आपल्या गावी रवाना झाले आहेत.
वसईत नवघर-माणिकपूर शहरातील दिवाणमान येथील सनसिटीच्या मैदानावर परराज्यात जाणाऱ्या परप्रांतीय मजूर व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून या मैदानात नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी जौनपूरसाठी चार, बदोईसाठी दोन आणि गोरखपूरसाठी एक अशा एकूण सात रेल्वे सुटणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे सोमवार रात्रीपासूनच मजुरांच्या गर्दीत भर पडू लागली होती. या मैदानावर हजारोंच्या संख्येने मजूर जमा झाले होते.
वसईतील महसूल आणि पोलीस प्रशासन या कामगार, मजूर आणि त्यांच्या कुटुंंबियांची काळजी घेत मार्गदर्शन करीत होते. ज्यांच्याकडे महसूल विभागाचे अधिकृत संदेश, आरक्षित तिकीट असेल अशा मजुरांची आरोग्य तपासणी, त्यांना मास्क, सॅनिटाईज, खाण्या-पिण्याची व्यवस्था करून परिवहनच्या बसेसने नवघर बस डेपोत आणून, सर्व सोपस्कार करून त्या त्या श्रमिक ट्रेनमध्ये बसविण्याचे काम सुरू होते.
वसईहून सुटणाºया ७ श्रमिक ट्रेन दुपारपासून दर तीन तासांच्या अंतराने सुटत असून एका गाडीत १६०० मजुरांना घेतले जात आहे. रात्री ९ आणि ११ वाजता सुटणाºया गाडीत बसविण्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. आज ७ ट्रेनमधून एकूण ११,२०० मजूर गावी गेले आहेत.
- स्वप्निल तांगडे,वसई प्रांताधिकारी