मुंबईतील व्यापा-याला दाऊदची धमकी?, सहा कोटींच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:40 AM2017-12-09T00:40:39+5:302017-12-09T00:41:11+5:30
मुंबईतील एका व्यापा-याला सहा कोटीच्या खंडणीसाठी दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या दिल्या जात असून खंडणीसाठी त्याच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या भूखंडावर कब्जा
वसई : मुंबईतील एका व्यापा-याला सहा कोटीच्या खंडणीसाठी दाऊद इब्राहिमच्या नावाने धमक्या दिल्या जात असून खंडणीसाठी त्याच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या भूखंडावर कब्जा करणा-या टोळीविरोधात वालीव पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंधेरी येथील व्यापारी अली जरार सिद्दीकी (५९) या व्यापा-याची वसई हद्दीत मुंबई-अहमदाबाद हायवेलगत कामण आणि बाफाणे या दोन ठिकाणी कोट्यवधी रुपयांची जमीन आहे. ही जमीन हडप करण्यासाठी दहा ते बारा जणांच्या एका टोळीकडून गेल्या महिन्यापासून सिद्दीकी यांना धमक्या दिल्या जात आहेत. दाऊद इब्राहिमच्या नावाने सिद्दीकी यांच्याकडे सहा कोटींची खंडणी मागितली जात आहे. सिद्दीकी यांनी ती देण्यास नकार दिला असता टोळीने थेट त्यांच्या मुंबईतील घरी आणि कार्यालयात जाऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांना व त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली आहे.
त्याला ही त्यांनी न जुमानल्याने संतापलेल्या टोळीने सिद्दीकी यांच्या कामण आणि बापाणे येथील कोट्यवधी रुपये किंमतीच्या भूखंडावर व कामण येथील त्यांच्या गोडाऊवरही कब्जा केला आहे. दोन्ही जागांवर कंटेनर ठेऊन टोळीचे सशस्त्र गुंड चोवीस तास पहारा देत असून त्याठिकाणी येणाºयाला मारहाण केली जात असल्याची सिद्दीकी यांची तक्रार आहे.
टोळीतील गुंड मोबाईलवर दाऊद बोलत असल्याचे सांगत असून समोरून बोलणारी व्यक्ती ठार मारण्याची धमकी देत सहा कोटी रुपयांची खंडणी मागत असतो, अशी त्यांची तक्रार आहे. टोळीतील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या नावानेही ही टोळी धमक्या देत असल्याचीही त्यांची तक्रार आहे.
या प्रकरणात पंकज भगवानदास ठाकूर आणि संजय जोशी या दोन इसमांचा सहभाग असल्याचा पुरवणी जबाब फिर्यादीने दिला आहे. त्याचाही तपास केला जात आहे. काही आरोपी सध्या फरार असून ते हाती लागल्यानंतर या प्रकरणा मागे खरे कोण आहे याचा निश्चित उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले
आहे.
याप्रकरणी वालीव पोलिसांनी अब्दुल कादर अगवान, अनिस सिंग, अब्दुल इब्राहिम, मोहम्मद हुसेन नागोरी, मोहम्मद शकिल नागोरी, शेख शहाबुद्दीन यांच्यासह आणखी पाच अज्ञात इसमांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने हायवे परिसरात मोकळ््या जागांवर कब्जा करून खंडणीसाठी अनेकांना धमक्या दिल्याच्या तक्रारी आहेत.