मोक्काचे तिन्ही आरोपी बेड्यांसह फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:26 PM2019-08-08T23:26:56+5:302019-08-08T23:27:21+5:30
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सातीवली खिंडीत हा प्रकार घडला.
नालासोपारा : सराईत गुन्हेगार, जबरी चोरी, दरोडे याप्रकरणी मोक्का लागलेले तीन आरोपी सेल्वास पोलिसांच्या ताब्यातून मंगळवारी रात्री पोलिसांना धक्काबुक्की करून बेड्यांसह पळून गेल्याची घटना घडली आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सातीवली खिंडीत हा प्रकार घडला. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत पळून गेलेल्या तीन आरोपींची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करून कोणाला दिसल्यावर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
तलासरी येथे राहणारे आरोपी जयराम लाखमा दळवी (२१), गणेश उर्फ बोक लाखमा दळवी (२०) आणि मार्टिन राज्या माढा (३०) यांच्यावर दरोडे, चोरी असे अनेक गुन्हे दाखल झाल्याने मोक्का लावण्यात आला होता. हे तिघे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. सेल्वासा येथे दरोडा टाकल्याप्रकरणी तेथील पोलीस त्यांच्या मागावर होते आणि हे तिन्ही आरोपी मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा ताबा घेण्यासाठी आले. त्यांना सेल्वासा सत्र न्यायालयात हजर करून पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात नेत असताना हा प्रकार झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सातीवली ब्रिजपुढे १०० मी. आल्यावर अनंतराव खिंडीत जयराम याने उलटीचे सोंग केले आणि गणेश व मार्टिन यांनी लघुशंकेचा बहाणा केला. गाडीतून उतरल्यानंतर तिघांनी एकमेकांना इशारे करून पोलिसांना धक्काबुक्की केली आणि जंगलातील कायदेशीर रखवालीतून ते पळून गेले. सेल्वासा मुख्यालयातील पोलिसांनी वालीव ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीनही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळाले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एका आदिवासी महिलेला ते जंगलात भेटले. रस्ता कोणत्या दिशेला आहे याची विचारणा त्यांनी या महिलेला केली. ही माहिती वालीव पोलिसांना मिळाल्यावर ते त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, तोवर हे तीनही आरोपी सदर ठिकाणाहून पळून गेले होते.