व्यापाऱ्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अटक; हल्ला करण्यासाठी दिली होती चार लाखांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:15 PM2023-07-10T18:15:30+5:302023-07-10T18:15:41+5:30
विरारच्या गोपचरपाडा येथे राहणाऱ्या व व्यापाऱ्यावर शनिवारी रात्री ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
(मंगेश कराळे)
नालासोपारा: विरारच्या गोपचरपाडा येथे राहणाऱ्या व व्यापाऱ्यावर शनिवारी रात्री ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. हा हल्ला करण्यासाठी मुख्य आरोपीने त्याच्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपींना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
विरारच्या गोपचरपाडा येथे राहणारे मोबीन शेख (४२) एलईडी लाईटचे व्यापारी आहेत. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे ऍक्टिव्हा दुचाकीवरून मकवाना कॉम्पलेक्स परिसरात बाजारात जात असताना दोन आरोपींने त्यांचे जवळील ऍसिड या अत्यंत दाहक व ज्वलनशील पदार्थाने भरलेली प्लास्टीक पिशवी त्यांच्या त्यांच्या मानेला लागली. त्यांना ताबडतोब अनुसया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराच्या माहितीवरून मुख्य आरोपी मस्तान उस्मान शेख (३९), संकेत परमेश्वर शर्मा (१८) आणि जयेश तरे (२२) या तिघांना ४८ तासांच्या आत विरारच्या वेगवेगळ्या परिसरातून अटक केले आहे. आरोपी मस्तान याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपी संकेत शर्मा आणि जयेश तरे या दोघांना चार लाख रुपयांची सुपारी देवून त्यांचेकरवी मोबिन यांचेवर ऍसिड हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मस्तान याचा पुर्वइतिहास पडताळुन पाहता त्याचेविरुध्द विरार पोलीस ठाण्यात मारामारी व सरकारी कामात अडथळा आणलेबाबत गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब प्रविण वानखेडे तसेच संतोष चव्हाण यांनी केली आहे.