भेसळयुक्त ४०० किलो पनीरसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:52 PM2019-02-01T22:52:43+5:302019-02-01T22:53:11+5:30
अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी पनीरचे नमुने आणि तिन्ही आरोपीना ताब्यात देत भेसळयुक्त पनीरसह इतर साहित्य नष्ट करण्यात आले.
नालासोपारा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी कामण रोड येथील एका तब्येल्यावर पालघर पोलीस अधीक्षकांच्या विशेष टीमने छापा घालून ४०० किलो भेसळयुक्त पनीरसह तिघांना अटक केली. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी पनीरचे नमुने आणि तिन्ही आरोपीना ताब्यात देत भेसळयुक्त पनीरसह इतर साहित्य नष्ट करण्यात आले.
वसई तालुक्यात विविध ढाबे, हॉटेल्स, रिसॉर्ट या ठिकाणी विविध कंपनीचे आरोग्यास घातक असलेले भेसळयुक्त पनीर, बटर मोठ्या प्रमाणात बनविले जात असल्याच्या तक्र ारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मिळालेल्या होत्या. गुरु वारी गुप्त महितीच्या आधारे विशेष टीमचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. गुरु वारी रात्रीच्या सुमारास हे पथक कामण चिंचोटी रोडवरील आश्रम शाळेच्या मागील बाजूला असलेल्या शुक्ला तबेला याठिकाणी पोहचले. तबेल्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर बनवताना पोलिसांनी अभिनव शुक्ला यांच्यासह दोन कामगारांना रंगेहाथ पकडले. ४०० किलो भेसळयुक्त पनीर, १० किलो ग्लिसरॉल पावडर, ५ ते ६ लिटर अॅसिटिक अॅसिड, बनावट दूध पावडर व इतर साहित्य सापडले. पोलिसांनी अन्न व ओषध प्रशासनाच्या अधिकाºयांना फोन करून घटनास्थळी बोलावले. अधिकारी आल्यानंतर पकडलेले तिन्ही आरोपी आणि पुढील तपासणी करण्याकरिता भेसळयुक्त पनीरचे नमुने पोलिसांनी दिले. १ लाख ६० हजार रु पये किंमतीचे भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे.