ऑनलाईन फसवणुकीचे साडे तीन लाख मिळाले परत
By धीरज परब | Published: December 25, 2023 06:51 PM2023-12-25T18:51:35+5:302023-12-25T18:51:50+5:30
रक्कम ज्या बँक खात्यावर वळती झालेली आहे त्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्याचा तपास सुरु आहे.
मीरारोड - ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगून भाईंदरच्या महिलेच्या खात्यातून ३ लाख ५६ हजार रुपये लुबाडले. ही रक्कम परत मिळवून देण्यात मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे. भाईंदरच्या उत्तन परिसरातील राहणाऱ्या जेनीफर पाटील यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने कॉल केला होता. आपण ॲक्सिस बँकेमधून बोलत असल्याचे भासवून त्यांच्याकडून बँकेची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. पाटील यांना एनी डेक्स ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाईल ॲक्सेस सायबर लुटारूंनी मिळवला.
त्या नंतर पाटील यांच्या नावे असलेली एफडी विड्रॉवल करून ती रक्कम पाटील यांच्या बँक खात्यावर घेऊन नंतर ती अन्य खात्यात वळती करण्यात आल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात १६ डिसेंबर रोजी आली होती. गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच अमीना पठाण, सुवर्ण माळी, कुणाल सावळे आदी कर्मचाऱ्यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन झालेल्या व्यवहाराबाबत माहिती मिळवली.
मिळालेल्या माहितीचे अवलोकन करून फसवणूक झालेल्या रक्कमेबद्दल जीओ पेमेंट बँक, ॲक्सिस बँक यांच्याकडे पाठपुरावा करत फसवणूक झालेली रक्कम थांबवण्यात आली. तसेच ती रक्कम पाटील यांच्या खात्यावर पुन्हा वळती करण्यात आली. तसेच उर्वरीत रक्कम ज्या बँक खात्यावर वळती झालेली आहे त्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मिळवली असून त्याचा तपास सुरु आहे.