डहाणूतील साडेतीनशे अंगणवाड्या नळजोडणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:45 PM2021-03-01T23:45:48+5:302021-03-01T23:45:54+5:30

मुलांना शुद्ध पाणी मिळणे आवश्यक : उन्हाळ्यात होणार वणवण

Three and a half hundred Anganwadas in Dahanu without plumbing | डहाणूतील साडेतीनशे अंगणवाड्या नळजोडणीविना

डहाणूतील साडेतीनशे अंगणवाड्या नळजोडणीविना

Next


अनिरुद्ध पाटील  
लोकमत न्यूज नेटवर्क 
बोर्डी : मार्च महिना सुरू होत नाही तोच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. आगामी तीन महिने  पाणीटंचाईचा प्रश्न अधिक भेडसावणार आहे. तालुक्यातील जवळपास साडेतीनशे अंगणवाडी केंद्रांना तर अद्याप नळजोडण्याच मिळालेल्या नसल्याने त्यांच्यावर येत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष बालके अंगणवाड्यांत येत नसली तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. यानिमित्ताने पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणीचा मुद्दा चर्चेला आला आहे. 
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या आतील बालकांना बालशिक्षणाचे धडे अंगणवाडी केंद्रातून दिले जातात. त्यांचा सर्वांगीण विकास साधताना, सर्व सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. केंद्राच्या इमारतीपासून आहार, पिण्याचे पाणी इ. मिळणे आवश्यक आहे. तालुक्यात डहाणू आणि कासा येथे दोन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालये आहेत. त्याअंतर्गत मुख्य आणि मिनी अशा एकूण ४०८ अंगणवाड्या आहेत. सध्या अंगणवाडी केंद्रे सुरू असली, तरी लाभार्थी बालके प्रत्यक्ष केंद्रात येत नाहीत. आठवड्यातून एक दिवस लाभार्थ्यांच्या पालकांना केंद्रात बोलावून आठवड्याचा आहार दिला जातो. 
दरम्यान, तालुक्यातील बहुतेक अंगणवाडी केंद्रांत नळाद्वारे पाणीपुरवठ्याची सोय अद्याप झालेली नाही. ४०८ पैकी ५९ अंगणवाडी केंद्रांना नळ पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. ११५ केंद्रांत हातपंप, १६० ठिकाणी बोअरवेल, ६० केंद्रांवर विहिरीद्वारे पाणीपुरवठा होतो. तर आजही ५१ केंद्रांची भिस्त सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्यावर आहे. यापैकी ३८ केंद्रांवर पाणी साठवण टाकी आहे. तर ३७० केंद्रांवर पाण्याची टाकीही नाही.

कुपोषणाचा प्रश्न आजही गंभीर
डहाणू, मोखाडा, तलासरी, जव्हार या आदिवासीबहुल तालुक्यांत आजही कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. कुपोषणाच्या भस्मासुराला दूर पळवायचे असल्यास प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर शुद्ध पाणीपुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

Web Title: Three and a half hundred Anganwadas in Dahanu without plumbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.