विक्रीकर खात्याला गंडा घालणारे तिघे अटकेत
By Admin | Published: January 30, 2016 02:18 AM2016-01-30T02:18:19+5:302016-01-30T02:18:19+5:30
खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना करात सूट मिळवण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन करून विक्रीकर खात्याला तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधात
वसई : खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना करात सूट मिळवण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन करून विक्रीकर खात्याला तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून महिला आरोपी फरार झाली आहे.
कंपन्यांची नोंदणी करून कोणत्याही प्रकारचा व्यवहार न करता बनावट बिले देऊन त्याबदल्यात व्यापाऱ्यांकडून एक टेफी वसूल विक्रीकर खात्याचा १ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विक्रीकर खात्याकडून रजनीकांत पारेख, हंसा पारेख, अजय पारेख, प्रकाश कोठारी यांच्याविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रजनीकांत, अजय आणि प्रकाश यांना अटक करण्यात आली आहे. तर, हंसा पारेख फरार झाली आहे.
रजनीकांत पारेख याने फॉरेवर एंटरप्राइजेस, अजय पारेख याने तुलीप एंटरप्राइजेस, हंसा पारेख हिने इलाइट एंटरप्राइजेस आणि प्रकाश कोठारीने कोठारी एंटरप्राइजेस, पद्मावती डाइज अॅण्ड केमिकल्स या नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांतून कधीही खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. व्यवहार करण्यासाठी लागणारी यंत्रणा, कर्मचारी, कार्यालय, गोडाऊन, विक्रीचा माल व इतर कागदपत्रे आढळून आली नाहीत. मात्र, कंपनीतून कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना बनावट बिले अदा करण्यात येत असत. बिले घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा धनादेश जमा झाल्यानंतर बिलापोटी एक टक्का रक्कम आरोपी घेत असत. त्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
रजनीकांत, अजय आणि हंसा पारेख यांनी ७७ लाख ४६ हजार १६६ रुपयांचा विक्रीकराचा अपहार केला आहे. तर, प्रकाश कोठारीने ३२ लाख ५० हजार ५६४ रुपयांचा विक्रीकर अपहार केला असल्याचे तपासात उजेडात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)