धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:45 AM2019-07-27T01:45:52+5:302019-07-27T01:45:57+5:30
आतापर्यंत १६४७ मि.मि. पावसाची नोंद
कासा : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण भरल्याने त्याचे तीन दरवाजे उघडले आहेत. यामुळे सूर्या नदीला पूर आला आहे.
पालघर जिल्ह्याला उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणाने ११४.६ मीटर पाणी पातळी गाठली असून धरण ८१ टक्के भरले आहे. पाण्याची पातळी आटोक्यात ठेवण्यासाठी धरणाचे १, ३ व ५ असे तीन दरवाजे गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता ३० सें.मी. उंचीने उघडले आहेत. धरणातून २२५२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर त्या खालील कवडास धरणची पाणी पातळी ६५.८५ मीटर असून तेही पूर्ण भरून वाहू लागले आहे. कवडास धरणातून सूर्या नदीत ६८९१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पूर आला आहे. धरण क्षेत्रात शुक्रवारी ५६ मि.मि. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १६४७ मि.मि. पाऊस पडला आहे.