मीरारोडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या तिघा फेरीवाल्यांना अटक; महापालिकेची तोडक कारवाई सुरु
By धीरज परब | Published: October 25, 2023 06:29 PM2023-10-25T18:29:29+5:302023-10-25T18:29:47+5:30
हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे.
मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील दुकानदारावर हल्ला करणाऱ्या २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नया नगर पोलिसांनी फेरीवाल्यांच्या एका म्होरक्यासह तिघांना अटक केली. तर हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे.
शांती नगर सेक्टर १ मधील मायरी दुकान मालक गंगासिंग राजपुरोहीत (६०) यांच्यावर २५ ते ३० फेरीवाल्यांनी हल्ला केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अझहर हैदर शेख (४८) रा. नुपूर, शांती नगर; अब्दुल अन्नान मोहमद सुतार (२४) रा. आलाय घाची, नया नगर व झोएब अल्ताफ शेख ( २५ ) रा. चंद्रेश रेसिडेन्सी, नया नगर ह्या तिघांना पोलिसांनी अटक केली . त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु असून वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. सी. करोडीवाल तपास करत आहेत. यातील अझहर हा येथील फेरीवालांचा म्होरक्या असून एका माजी नगरसेवकाचा हस्तक असल्याचा आरोप होत असतो.
फेरीवाल्यांच्या गुंडगिरीचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर ठोस कारवाईची मागणी आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक सह अनेक माजी लोकप्रतिनिधी आदींनी घटनास्थळी लोकांची भेट घेऊन केली आहे . तर आयुक्त संजय काटकर यांनी घटनेचे गांभीर्य पाहून अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले .
उपायुक्त मारुती गायकवाड , विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , प्रभाग अधीकारी स्वप्नील सावंत, फेरीवाला पथक प्रमुख भैरू नाईक सह पालिकेचे कर्मचारी, सुरक्षा बाळाचे जवान आदींनी सोमवार पासून येथील फेरीवाले व अतिक्रमणावर कारवाई चालवली आहे. येथील एका जागेत बेकायदा उभारलेले पत्र्याचे गाळे, जिना आदी तोडून टाकण्यात आले. तर हातगाड्या, बाकडे हे जेसीबीने तोडून टाकण्यात आले आहेत. आता पर्यंत सुमारे १०० हातगाड्या तोडल्याचे स्वप्नील सावंत म्हणाले. तर फेरीवाल्यां वरील कारवाईने हप्तेबाजी बुडाल्याचा राग काही जणांना येत असावा असा टोला लगावत एका पालिका अधिकाऱ्याने दुकानदारांचे शेड सुद्धा तोडू असे नेहमीचे धमकीतंत्र चालवल्याची गोष्ट आयुक्तांच्या कानावर घातल्याचे आ. जैन यांनी सांगितले.
आ. प्रताप सरनाईक यांनी सुद्धा बुधवारी आयुक्त काटकर यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. तर फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. गेल्या अनेक वर्षां पासून नागरिकांनी फेरीवाल्यांच्या मुजोरी, गुंडगिरी व होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी चालवल्या असल्याचे हितेंद्र आचार्य, मिलन भट, आदींनी सांगितले.