तीन अपत्ये असल्याने वसरे ग्रा.पं. सदस्याचे पद रद्द
By admin | Published: April 30, 2017 03:51 AM2017-04-30T03:51:16+5:302017-04-30T03:51:16+5:30
अपर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी तालुक्यातील खडकोली वसरे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश वामन पडवळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवले आहे.
पालघर/नंडोरे : अपर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी तालुक्यातील खडकोली वसरे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश वामन पडवळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवले आहे. त्यांना तीन अपत्य असतांनाही उमेदवारी अर्जातील अपत्यांसंबंधीच्या घोषणपत्रात दोन पेक्षा जास्त मुले नसल्याची खोटी माहिती दिली होती.
ग्रामपंचायतीच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत खडकोली-वसरे ग्रामपंचायतीच्या ‘क’ प्रभागातून निवडून आलेले सदस्य रमेश वामन पडवळे यांनी आपत्याबाबत खोटी माहिती सादर केली असल्याने रमेश पडवळे यांना सदस्य म्हणून अपात्र ठरवावे असा पुराव्यानिशी अर्ज प्रकाश शेलार यांनी १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
अधिनियमानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणारा उमेदवार ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो सदस्य पडवळे यांना १५ मार्च १९९६ रोजी योगेश व त्यानंतर ३० आॅक्टोबर २००१ रोजी योगिता व १५ नोव्हेंबर २००३ रोजी हेमंत अशी तीन अपत्य झाल्याचा दावा प्रकाश शेलार यांनी आपल्या अर्जात केला असून त्याच्या पृष्ठयर्थ प्रकाश शेलार यांनी ग्रामपंचायतीकडून मिळवलेले दाखले व योगेश या मुलाच्या अनुषंगाने आधार कार्डाअंतर्गतच्या माहितीचा पुरावा जोडलेला आहे. तक्रारदार प्रकाश शेलार यानी अर्ज सादर करून वर्षाचा कालावधी होत आला असून याप्रकरणी आजवर सातवेळा सुनावणी झाल्याचे समजते. पडवळे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पडवळे यांना अपात्र ठरविले. (वार्ताहर)