पालघर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:27 AM2017-10-07T05:27:29+5:302017-10-07T05:27:35+5:30
शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत.
पालघर/ मनोर/ कासा : शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत. पालघरमध्ये एका धोकादायक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात सुदैवाने १८ कुटुंबे वाचली आहेत. तसेच अनेक भागातील शेतकºयांच्या घराचे पत्रे वादळी वाºयाने उडून गेले आहेत. तसेच कापणी करून शेतात रचलेले पीक भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेही उशिराने धावल्या.
शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वसई तालुक्यांत संध्याकाळी ५ वाजता विजेच्या वादळीवारी, कडकडाटासह पडलेल्या पावसाने धुमाकूळ घातला.
मनोरजवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्रमगड तालुक्यातील एकनाथ काशिनाथ शेलार (३५, रा. केव) या तिघांचा मृत्यू झाला. नारायण खेवटा व अन्य १० ते १२ लोकांच्या अंगावर वीज कोसळली. तर एकूण १५ जखमी झाले आहेत.
जुना पालघर येथील प्रकाश बेकरी नामक धोकादायक ठरवलेल्या दोन मजली इमारतीचा मागचा भाग कोसळला. सुदैवाने या इमारतीमधील १८ कुटुंबांचा जीव वाचला. तर बहाडोली येथील एका घरावर वीज पडून ते घर मधोमध चिरले गेले. यात प्राणहानी झाली नाही. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झाड पडल्याने काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.