वाडा तालुक्यातील ठाकरे कुटुंबामधील तिघांचा २० दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:54 AM2021-05-03T00:54:34+5:302021-05-03T00:55:06+5:30
आई-वडील, तरुण मुलाच्या निधनाने ऐनशेत गावावर शोककळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्याही वाढती आहे. अगदी चालती-बोलती आणि तरुण माणसेही या महामारीची
बळी ठरत आहेत. अनेक कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत. अशीच घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा २० दिवसांत मृत्यू झाल्याने तालुक्यातील ऐनशेत गावावर शोककळा पसरली आहे. ऐनशेत गावातील ठाकरे कुटुंबातील आई, वडील, मुलगा, सून व लहान मुले असे संपूर्ण कुटुंबच कोरोनाने बाधित झाल्यानंतर दि. ११ एप्रिल रोजी सविता सदानंद ठाकरे यांचे कोरोनाने निधन झाले. याच वेळी त्यांचे पती व मुलगाही रुग्णालयात उपचार घेत असतानाच सविता यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी २२ एप्रिल रोजी त्यांच्या ३४ वर्षीय मुलाचा सागर सदानंद ठाकरे यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी दि. १ मे रोजी रुग्णालयात उपचार घेत असलेले सागरचे वडील सदानंद भास्कर ठाकरे यांचेही दुर्दैवी निधन झाल्याने ठाकरे कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबावर व ऐनशेत गावात हळहळ व्यक्त होत असून गावावरच शोककळा पसरली आहे.
कोरोना महामारीने सुखी कुटुंबावर घाला
सदानंद ठाकरे हे कृषी खात्यातून तीन वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते तर सागर हा बी.एस्सी. ॲग्रिकल्चरची पदवी घेऊन कृषी खात्यातच कंत्राटी पद्धतीने सेवेत होता व स्वत:चा नर्सरीचा व्यवसायही करत होता. परंतु कोरोना महामारीने या सुखी कुटुंबावर घाला घालून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले आहे.