महिलेच्या छातीतून तीन किलोचा काढला ट्युमर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:02 AM2021-01-31T02:02:38+5:302021-01-31T02:03:04+5:30
Health News : कोरोनाच्या संकटात अनेकांनी उपचार पुढे ढकलले तर काहींनी थांबविले. त्यामुळे अनेक समस्या वाढल्या आणि या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना आव्हानात्मक झाले आहे.
नालासोपारा : कोरोनाच्या संकटात अनेकांनी उपचार पुढे ढकलले तर काहींनी थांबविले. त्यामुळे अनेक समस्या वाढल्या आणि या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना आव्हानात्मक झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कठीण शस्त्रक्रिया बोरिवली येथील अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडली. विरार येथील ६५ वर्षीय रेश्मा खन्ना (नाव बदलले आहे) यांना जीवनदान मिळाले आहे.
रेश्मा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. स्कॅन चाचणी केल्यानंतर त्यांच्या छातीत गाठ असल्याचे समोर आले. सिटी स्कॅन व इतर चाचण्या केल्यानंतर छातीच्या डाव्या बाजूला एक ट्युमर आढळून आला.
हा ट्युमर मोठा असल्याने फुफ्फुसाच्या झडपांवर त्याचा ताण येत होता. त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ व शल्यविशारद डॉ. आदित्य मानके म्हणाले, हा ट्युमर हृदय व फुफ्फुसाच्यामध्ये होता. अशा शस्त्रक्रिया जोखमीच्या मानल्या जातात.
रुग्णाचे वय व शारीरिक स्थिती पाहता त्यांचा जीव वाचविणे कठीण बाब होती, परंतु आमच्या टीमने हे आव्हान स्वीकारून सलग सहा तास शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढला. हा ट्यूमर तीन किलोचा होता. डॉ. झकी बेल्लारी, डॉ. शार्दुल मलकानी आणि भूलतज्ज्ञ डॉ. सागर गायकवाड यांनी या शस्त्रक्रियेत फार महत्त्वाची भूमिका बजावली.