तीन सरपंच, उपसभापतींसह कार्यकर्ते भाजपमध्ये? पालघरमध्ये आज पक्ष प्रवेश कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:26 PM2024-01-03T14:26:44+5:302024-01-03T14:27:06+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे संकेत मिळू लागल्याने भाजप, दोन्ही शिवसेना, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आदी पक्षांकडून आक्रमक रणनीती आखली जात आहे.
पालघर : जिल्ह्यात भाजप भलतीच आक्रमक झाली असून, नुकत्याच झालेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट विजयी झालेल्या तीन सरपंच आणि एका उपसभापतीसह अनेक कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट येथील मेळाव्यात होणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे संकेत मिळू लागल्याने भाजप, दोन्ही शिवसेना, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आदी पक्षांकडून आक्रमक रणनीती आखली जात आहे. चिंचणी येथे शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हा निरीक्षक पांडुरंग पाटील, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत बुथ स्तर बांधणी मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कार्य म्हणून शिवदूत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पक्ष प्रवेश होणार आहे.
- पालघर लोकसभा मतदार संघ सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे असून, विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच पुढच्या पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असतील, असे नरेश मस्के यांनी जाहीर केले होते. या घोषणेआधीच भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर लोकसभा आणि तीन विधानसभा कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले होते.
युतीला ठेच लागण्याची शक्यता
अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत थेट मतदारातून निवडून आलेल्या ५१ नवनिर्वाचित सरपंचांपैकी पालघर तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि एक पंचायत समितीचा उपसभापती भाजप पक्षाच्या गळाला लागल्याची खात्रीलायक बातमी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. या पक्ष प्रवेशात जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.