अफवेने घेतला तिघांचा बळी; चोर समजून जमावाचा हल्ला; डहाणूतील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:15 AM2020-04-18T06:15:04+5:302020-04-18T06:16:03+5:30
११० जण घेतले ताब्यात
कासा (जि. पालघर) : डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. समजून सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला आहे. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.
हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे रोखून चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुºहाडी आणि दगडांच्या साहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीही याच भागात सारणी येथे दोघांवर व चार पोलिसांवर हल्ला झाला होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ नये.
- डॉ. कैलास शिंदे,
जिल्हाधिकारी, पालघर