डहाणूत अन्न सुरक्षा योजनेचे तीनतेरा
By admin | Published: August 4, 2015 03:21 AM2015-08-04T03:21:16+5:302015-08-04T03:21:16+5:30
डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत
डहाणू : डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत राहणाऱ्या हजारो आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी डहाणू रास्तभाव दुकानदारांच्या एका शिष्टमंडळाने डहाणू तहसीलदारांना केली आहे.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या व सत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ७५ हजार रेशनकार्डधारक असून त्यात ४५ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहे. डहाणू तालुक्यात गेल्या चोवीस वर्षांपासून केंद्र शासनाने उद्योगबंदी लादल्यामुळे येथे कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही. परिणामी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त तांदूळ, गहू, साखर, तेल, रॉकेल आदी वस्तूंचा येथील हजारो आदिवासी कुटुंबांना मोठा आधार असतो. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून येथील रास्तभाव दुकानदारांना धान्य मिळत नाही.
मागील आघाडी सरकारने जानेवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा योजना सुरू केली. त्यानुसार अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका लाभार्थ्याला प्रति माह ३५ किलो धान्य तसेच प्राधान्य कुटुंबाला पाच किलो प्रति माह धान्य पुरविण्यात येत होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाने मोठ्या प्रमाणात धान्यसाठ्यात कपात केल्याने गोरगरिबांना प्रचंड महागाईत जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहेत. त्यातच गेल्या मे, जून, जुलैपासून बहुसंख्य धान्य दुकानदारांनी पैसे भरून धान्याचे परमिटदेखील मिळविले. परंतु, एफसीआय (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) मधून होणाऱ्या अपुऱ्या धान्य पुरवठ्याने दुकानदार व रेशनकार्डधारक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)