कळंब बीचवर तीन तरुण बुडाले, एकाच मृत्यू तर दोघांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:53 PM2022-08-03T18:53:13+5:302022-08-03T18:54:13+5:30
Drowning Case : एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.
नालासोपारा : कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटक तरुण मंगळवारी संध्याकाळी बुडाल्याची घटना घडली आहे. यातील दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह अद्याप पर्यंत भेटला नसल्याची माहिती अर्नाळा पोलिसांनी दिली आहे. एकूणच या घटनेमुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील कळंब गावातील समुद्रकिनारी फिरण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी तीन तरुण आले होते. हे तिन्ही तरुण समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले. पण त्यावेळी असलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने ते तिघे खोल समुद्रात खेचले गेले होते. हे तरुण समुद्रत ओढले जात असल्याचे पाहून कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन स्वताच्या जिवाची पर्वा न करता दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश मिळविले तर एक तरुण सापडला नाही. त्याचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नसून त्याचा मृतदेह सापडला नाही. वसईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०) आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) या दोघांना वाचविण्यात यश आले तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या हा मात्र पाण्यात वाहून गेला आहे. या बाबतचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.