सफाळ्यात रंगला मॅटवरील इनडोअर कबड्डीचा थरार; श्रीराम विरार संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:17 PM2021-02-22T23:17:32+5:302021-02-22T23:17:58+5:30
या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम विरार संघाने तर द्वितीय क्रमांक कुलाई सफाळा संघाने पटकावला.
सफाळे : जिल्हा परिषद मराठी शाळा नारोडा येथील मैदानात मॅटवरील इनडोअर भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा पालघर जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री कुलाई क्रीडा मंडळ, सफाळे यांनी आयोजित केल्या होत्या. निमंत्रित पुरुष २४ संघ व महिला १२ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम विरार संघाने तर द्वितीय क्रमांक कुलाई सफाळा संघाने पटकावला. तृतीय विजेतेपदाचा मानकरी अष्टभुजा रानगाव व दिनकरपाडा स्पोर्ट संघ ठरला, तर महिला गटात प्रथम क्रमांक श्रीराम संघ विरार यांनी बाजी मारली, तर द्वितीय क्रमांक कुलाई क्रीडा मंडळ सफाळे यांनी पटकावला. या स्पर्धेचे आयोजन मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले होते.
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री व जिल्हा परिषद सदस्या मनीषा निमकर यांनी केले.
या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आमदार राजेश पाटील, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण राऊत, महेंद्र ठाकरे, पिका पडवले यांनी उपस्थिती दर्शवली. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कबड्डी स्पर्धेत विशेष म्हणजे मंडळाकडून आलेल्या पाहुण्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करून सन्मानित करण्यात येत होते.