अंगठ्यामुळे वाढणार कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:20 PM2021-05-04T23:20:18+5:302021-05-04T23:20:38+5:30
मोफत धान्यासाठीची ई-पॉस यंत्रणा : वापर चुकीचा असल्याचे दुकानदारांचे मत
सुनील घरत
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य शिधावाटप दुकानांतून करण्यात येत आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता ई-पॉसवर अंगठा घेऊन अन्नधान्य वाटप करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांना याचा धोका निर्माण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहेत. जिल्ह्यातील एकूण साडेबारा लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. वसई शहरात शनिवारपासून या अन्नधान्य वाटपाला प्रारंभ झाला आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूरवर्गापुढील समस्या गंभीर बनल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. तसेच ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. वसई तालुक्यात कोरोना लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असताना आता धान्यासाठी अंगठा वापरणे हे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरेल, असे मत दुकानदारांनी व्यक्त केले.
सामाजिक अंतर राखणे दुकानदारांना अशक्य
nदुकानात येणाऱ्या नागरिकांना मास्क, सामाजिक अंतर याचे पालन करणे गरजेचे असून सॅनिटायझर होणे गरजेचे आहे. तरच धोका कमी होऊ शकणार आहे. ई-पॉस मशीनवर अंगठा देऊन धान्य घ्यावे लावत असल्याने हे आमच्यासाठी धोक्याचे आहे.
nअनेकदा ग्राहकांचा अंगठा हातात धरून तो मशीनवर ठेवावा लागतो. त्यामुळे सामाजिक अंतर पाळता येत नाही. काही मास्क न घालताच धान्य घेण्यासाठी येतात. अशा वेळी कोरोनाचा संसर्गाची शक्यता आहे. तर सॅनिटायझर प्रत्येकदा वापरणे परवडणारे नसल्याने प्रशासनाने याचा विचार करावा, असे रेशनिंग चालकांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ई-पॉस मशीनवर अंगठा वापरण्यास दुकानदार यांनी विरोध केला आहे. यामुळे आता दुकानदार आपल्या अंगठ्याचा वापर करून शिधापत्रिकाधारकासमोर पावती देईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकाला अंगठा वापरता येणार नसल्याने कोरोना प्रादुर्भावाचा धोका कमी होणार आहे.
- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई