तिकिटाचे आगाऊ पैसे घेतले पण बसेस सोडल्याच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 01:15 AM2019-09-04T01:15:14+5:302019-09-04T01:15:27+5:30

विरारमधील प्रकार : भाजपकडून गणेशभक्तांची फसवणूक

Tickets are paid in advance but the buses are not released | तिकिटाचे आगाऊ पैसे घेतले पण बसेस सोडल्याच नाहीत

तिकिटाचे आगाऊ पैसे घेतले पण बसेस सोडल्याच नाहीत

Next

वसई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरार- नालासोपारास्थित मतदार नागरिकांना आकर्षित करण्यासाठी भाजप-शिवसेनेने कोकणातील गणेश भक्तांसाठी नालासोपाऱ्यातुन अल्पदरात बस सेवा राबवली होती. यासाठी नालासोपारा विधानसभेतील मतदारांचे आधारकार्ड, रेशनकार्ड घेऊन प्रति माणसी १०० ते ५०० रु पये घेऊन महिन्याभरापासून आगाऊ तिकीट बुकिंग केले होते. याबाबत अनेक ठिकाणी शिवसेना भाजपाने बॅनरबाजी ही केली होती. कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी शिवसेनेने ४५ बस सोडल्या. मात्र भाजपकडून अद्याप कोकणात जाणारी एकही बस सोडली नसल्याने शनिवारी पाचशेहून अधिक भाविक विरारमध्ये अडकून पडले.
विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात ओम रिजेन्सी या इमारतीमध्ये भाजपच्या कामगार आघाडीने एक कार्यालय थाटून महिनाभरापासून कोकणात जाणाºया गणेशभक्तांचे अल्पदरात आगाऊ बुकिंग सुरू केले होते. यामध्ये भाजपा कामगार आघाडीच्या माध्यमातून ‘कोकण व्हिजन’ नावाखाली ५५० ते ६०० रु पये प्रति सीट अशा २ हजार नागरिकांचे बुकिंग केले.

स्वस्त आणि घरापासून जवळ असल्याने अनेकांनी पैसे भरुन बसेसचे बुकिंग ही केले. या बुकींगची रितसर पावतीही कोकणात जाणाºया भक्तांना देण्यात आली. त्यानुसार बुकींग केलेले अनेक चाकरमानी कोकणात जाण्यासाठी शनिवारी संध्याकाळपासून ठरलेल्या वेळी विरार येथील कार्यालयाजवळ जमा व्हायला लागले. काहीजण रात्री ८ वाजल्यापासून बसमध्ये बसले, मात्र, बस सुटेल की नाही, याबाबत काहीच कळत नसल्याने नागरिक संतप्त झाले.

कोकणात जाणारे रखडले !
कोकणातील सावंतवाडी, देवरुख, लांजा, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, मालवण, तरळी, कणकवली, गणपतीपुळे, दापोली, गुहागर, चिपळूण, महाड, देवगड, वेंगुर्ले, साखरपार, सावर्डे आदी या ठिकाणी हे भक्तगण जाणारे होते.
कोकणवासीय संतप्त !
आपली फसवणूक झाली आणि आता काही आपण कोकणात गणपती साठी वेळेवर पोहचू शकत नाही यामुळे संतप्त नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांना पकडून विरार पोलिसांच्या ताब्यात देत पोलीस ठाण्यासमोरच घेराव घातला होता. या सर्व प्रकारानंतर वसई - विरार महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या भक्तांची भेट घेत, बसची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. पण रात्रीची वेळ असल्याने तात्काळ बस मिळणेही कठीण झाले होते.

भाजप कामगार आघाडी सेलचे उदय शेट्टी आणि त्यांचे सहकारी यांनी कोकणात जाणाºया बºयाच भक्तांची आगाऊ तिकीटविक्री करून घोर आर्थिक फसवणूकं केल्याची माहिती मला मिळाली आहे. हे योग्य नाही. भाजपचा बॅनर लावून संयुक्त विद्यमाने काही उद्योग चालवले जात आहेत. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची नक्कीच गंभीर दखल घेतली जाईल.
- शेखर धुरी,
भाजप प्रदेश प्रतिनिधी, वसई

Web Title: Tickets are paid in advance but the buses are not released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.