यंदा बारजाई दैवताला दुरूनच दंडवत; कोरोना प्रादुर्भावाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:09 AM2020-07-01T01:09:22+5:302020-07-01T01:09:36+5:30
आदिवासी समाज निसर्गपूजक असल्याने चांगला पाऊस पडावा यासाठी डहाणू व तलासरी तालुक्यात बारजाई दैवताला साकडे घातले जाते.
बोर्डी : मुबलक पाऊस पडून सगळीकडे आनंदीआनंद नांदावा, याकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी पश्चिम घाटाच्या रांगांमधील जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचा बारडा डोंगरावर जाऊन बारजाई देवीकडे साकडे घालतात. काही वर्षांपासून २ जुलै हा जत्रेचा दिवस ठरविण्यात आला असून सुमारे पाच हजार भाविक या स्थळाला भेट देतात, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्याने भक्तांना एकत्रित येऊ नये अन्यथा कारवाईचे संकेत दिले आहेत.
आदिवासी समाज निसर्गपूजक असल्याने चांगला पाऊस पडावा यासाठी डहाणू व तलासरी तालुक्यात बारजाई दैवताला साकडे घातले जाते. जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून महाराष्ट्र - गुजरात सीमाभागात बारडा डोंगर आहे. हा जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचा डोंगर असून तेथे पाषाणात लेणी कोरलेली असून तेथे बारजाई हे दैवत आहे. या डोंगराला आदिवासी आणि पारसी समाजाचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. बारजाई डोहारा राजाचा हा गड असल्याचा ऐतिहासिक उल्लेख आढळतो. तेथे काळ्या पाषाणात कोरलेली गुहा, भूचर, पाण्याची टाकी आणि उभे स्तंभ आहेत. १४ व्या शतकाच्या प्रारंभी पर्शियातून पारशी समुदाय गुजरातच्या संजाण बंदरात पोहचल्यावर, या शतकाच्या मध्यकाळात दिल्लीच्या सुलताना-पासून समुदाय आणि त्यांच्या पवित्र अग्नीचे संरक्षण करण्यासाठी डोहारा राजाकडे समुदायाने आश्रय घेतला होता. या डोंगरवरील भुयारात राजाने त्यांना एक तपापेक्षा अधिक काळ आश्रय दिल्याचा इतिहास आहे.
जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने भक्तांनी या वर्षी दर्शनाला न जाण्याचे आवाहन केले असून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. - बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारी
या विषाणूची लागण होण्यापासून आदिवासी बांधव सुरक्षित राहावेत याकरिता हे पाऊल उचलण्यात आले असून त्याला ग्रामपंचायतींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. - गोकूळ धोंडी, सरपंच, जांबूगाव
प्रशासनाच्या आदेशानुसार नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून उपाययोजना आखल्या आहेत. शिवाय त्यांना परिणामांची जाणीव करून देण्यात आली आहे. - जी. एस. बोरसे, ग्रामविकास अधिकारी, अस्वाली ग्रामपंचायत