वसईत विद्यार्थांना पोहत शाळेत जाण्याची वेळ, जीव तळ हातावर घेऊन प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 07:02 AM2017-10-14T07:02:08+5:302017-10-14T07:02:49+5:30
समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना पोहून प्रवास करावा लागत आहे.
सुनिल घरत
पारोळ : परिसरामध्ये समृद्धी मार्ग, बडोदा वे असे महामार्ग होत असताना वसई पूर्व भागातील बुरुडपाडा येथे नाल्यावर पूल नसल्याने या गावातील विद्यार्थ्यांना सबंध पावसाळ्यामध्ये पोहून प्रवास करावा लागत आहे. पोहून जात असताना कुणी प्रवाहात वाहून जाऊ नये या साठी साखळी तयार करून एकमेकांचे रक्षण केले जाते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भागामध्ये अनेक विकास योजना राबविल्या गेल्या मात्र, गावातील या नाल्यावर पुल (साकव) नसल्याने दररोज विद्यार्थ्यांना जीव तळ हातावर घेऊन प्रवास करावा लागतो. गावक-यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, अनेकदा खड्डे खणले जातात पुढे घोडे कुठे पेंड खात हे कळत नाही.
मिन्नतवा-या करुन थकलेल्या बुरुडपाड्यातील नागरीकांनी आता आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे लोकमतला सांगितले. साधारण दहा वर्षांपुर्वी या भागातील रस्त्याची दुरुस्ती झाल्याचे गावकरी सांगतात.
रोजचा पोहुन प्रवास करणा-या विद्यार्थ्यांना व विद्यार्थींनींना ओल्या कपड्याने शाळेत जावे लागते. त्यामुळे त्यांना वर्गात बसतांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा लवकर निघूनही शाळेत वेळेवर पोहचता येत नाही.
"पावसाळ्यात आम्हाला जीवघेणा प्रवास करावा लागतो तसेच आजारी माणसाला उपचारा साठी कसे न्यायचे हा ही प्रश्न उभा राहतो. शिक्षणासाठी शासन विविध सुख सुविधा पुरवत असताना आमच्या गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीवघेणा प्रवास करावा लागतो. हे आमच दुर्दैव आहे''.
- शरद बुरु ड,गावकरी