युती अन् बविआ आमनेसामने; तुल्यबळ लढतीचे चिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 10:53 PM2019-03-10T22:53:31+5:302019-03-10T22:55:21+5:30

लोकसभा निवडणूकीचे पडघम, आचारसंहिता काळात एकमेकांवर लक्ष

Together with the Alliance and Bubia; Match | युती अन् बविआ आमनेसामने; तुल्यबळ लढतीचे चिन्ह

युती अन् बविआ आमनेसामने; तुल्यबळ लढतीचे चिन्ह

Next

पालघर : युती करताना घातलेल्या अटीत भाजपाच्या ताब्यातून खेचून घेतलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याचवेळी एक तरी लोकसभा मतदारसंघ हाताशी असावा आणि त्यायोगे केंद्रातील सरकारशी वाटाघाटी करता याव्या, यासाठी बहुजन विकास आघाडीलाही या मतदारसंघात विजय मिळवणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील लढत दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

आपल्या ताब्यातील मतदारसंघ शिवेसेनेला गेल्यामुळे भाजपात असलेली नाराजी गृहीत धरून सध्या शिवेसनेचे नेते काम करत आहेत. पूर्वी शिवसेनेचे नेते असलेले आणि सध्या युतीसोबत राहून मदत करणारे विवेक पंडित यांची येथे शिवसेनेला मदत होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा-शिवसेनेला रोकण्यासाठी बहुजन विकास आघाडीला मदत करण्याचा निर्णय घेतल्यास आणि या मतदारसंघातील काही भागात जोर असलेल्या कम्युनिस्टांसह अन्य छोट्या पक्षांनीही त्यांना साथ दिल्यास येथील लढत चुरशीची होऊ शकते.

पालघर लोकसभेचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या अकस्मात मृत्यूने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने त्यांचा मुलगा श्रीनिवास यांना पक्षात घेऊन उमेदवारी देत भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत ही पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग त्यांनी बांधला. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या आणि अस्वस्थ असलेल्या काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना भाजपाची उमेदवारी देत मुख्यमंत्र्यांनी पहिली खेळी खेळली. आपली संपूर्ण ताकद पणाला लावत वसई तालुक्यात घुसून त्यांनी आपला सहकारी घटक पक्ष, पण निवडणुकीतील विरोधक असलेल्या बविआला रोखण्याचे काम केले.

शिवसेनेला पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड भागात बऱ्यापैकी रोखण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनाही वसई, नालासोपारा या विधानसभा क्षेत्राबाहेर अडवले. साम, दाम, दंड, भेद या राजकीय शस्त्रांचा पुरेपूर वापर करीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमला रोखून धरले. आपली ताकद पणाला लावीत भाजपने मात्र ही जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणली असली, तरी शिवसेना आणि भाजपामध्ये फक्त २९ हजार ५७२ मतांचा फरक राहिला. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा व ताकद लावली होती ते पाहता हा फरक खूप मोठा नव्हता. मतदारसंघ प्रतिष्ठेचा करूनही फारसे मताधिक्य मिळाले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले होते.

या निवडणुकी नंतर युतीमध्ये बेबनाव निर्माण होत गेला आणि दोन्ही बाजूने अगदी खालच्या पातळीवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झालेले सर्वांच्यात लक्षात आहेत. तरी ओसरलेली मोदींची लाट आणि काही राज्यात भाजपाच्या विरोधात गेलेला मतदारांचा कौल पाहता केंद्रातील सत्ता पुन्हा टिकवून धरण्यासाठी एका-एका खासदारांची आवश्यकता पाहता मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला सत्तेच्या संकटात टाकून पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रात युतीला होकार देत पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला दिली. पालघर लोकसभा क्षेत्रातील विक्र मगड, जव्हार आदी अनेक विधानसभा क्षेत्रातील महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करीत आपले राजीनामे दिले असले, तरी केंद्रातील सत्तेसाठी आपल्याला एक-एक मतदारसंघ महत्वाचा असल्याचे पटवून सांगितल्यानंतर हे राजीनामे मागे घेण्यात आले. पण पक्ष आणि परिवारातील नाराजी कायम आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना-भाजपा आणि मित्र पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वनगा आणि बविआच्या उमेदवारांत थेट लढत हाईल. बहुजन आघाडीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याचवेळी महाआघाडीचे अजून निमंत्रण आले नसल्याचे बविआचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले होते. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवाद्यांची ठाकुराना पाठिंबा देण्याबाबत बोलणी सुरू आहेत. पण सध्या भाजापसोबत असताना आता भाजपाविरोधकांची मदत घ्यावी की नाही, याबाबत ठाकूरद्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. राज्यात युती तर जिल्ह्यात मात्र आजही शिवसेना, भाजपात आलबेल नसल्याचा फायदा बविआ कितपत उठवू शकते, हेही महत्वाचे आहे.

एकनाथ शिंदेच्या व्यूहरचनेकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून दिल्या जाणाºया विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना बविआची मदत घेतली होती. त्यामुळे शिंदे-ठाकूर यांच्यातील संबंध चांगले असल्याचे मानले जाते. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या बलस्थानांच्या परिसरातील कामांना मंजुरी देत मतदारांत संभ्रम निर्माण केला होता.

आताही ते वसई, विरार, नालासोपारा या बविआच्या बलस्थानांवर लक्ष देतील अशी चिन्हे आहेत. अशी कामे करतानाच भाजपाची मदत मिळणार नाही, हे गृहीत धरून ते ठाकूरांशी असलेल्या संबंधांचा वापर करतील का, याचीही चर्चा सुरू आहे.

लोकसभेसाठी १८ लाख १२ हजार ९८३ मतदार असून मागच्या वेळेपेक्षा ही संख्या ८१ हजार ९०६ ने वाढली आहे.

Web Title: Together with the Alliance and Bubia; Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.