शौचालय एक, लाभार्थी अनेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:54 AM2018-04-11T02:54:56+5:302018-04-11T02:54:56+5:30
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार-मोखाडा भागात स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयांची उभारणी पुर्ण झाल्याचे जाहीर करुन शंभर टक्के हागणदारी मुक्तच्या घोषणा देण्यात आल्या असून संबधितांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार-मोखाडा भागात स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयांची उभारणी पुर्ण झाल्याचे जाहीर करुन शंभर टक्के हागणदारी मुक्तच्या घोषणा देण्यात आल्या असून संबधितांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. स्वच्छ भारताचे खोटे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या पालघर जिल्ह्यातील खरे वास्तव समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील गु्रप-ग्रामपंचायत काष्टी-सावर्डे येथे एकाच शौचालयाचे अनेक लाभार्थी दाखवून स्वच्छ भारत मिशन या संकेत स्थळावर अपलोड करून मोठा घोटाळा करण्यात आला आहे.
बनवा बनवीचा हा प्रकार काष्टीपाडा येथील अमोल वांगड याने उघडकीस आणली असून त्यांच्या घरातील वैयक्तीक शौचालयासमोर विविध लाभार्थी उभे करून फोटो काढण्यात आलेले होते. ते तात्कालीन ग्रामसेवक शांतशिल धुरंधर या ग्रामसेवकाने शासनाच्या वेबसाईटवर अपलोड सुध्दा केलेले होते.
वास्तविक, या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सर्व शौचालयांची दुरावस्था असून अनेक अपुर्णावस्थेत आहेत. काष्टी-सावर्डे ग्रामपंचायतीत सावळा गोधंळ सुरू असून त्यात चालणाºया कामकाजाची चौकशी व्हाही असे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. तसेच तक्रारी अर्जानंतर वेबसाईटवरून पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे फोटो काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
अमोल याने त्यांच्या शौचालयासमोर उभे राहणाºया लाभार्थ्यांना विचारले असता, आम्हाला ग्रामसेवक धुरंधर भाऊसाहेब यांनी सांगितले आहे, असे उत्तर या अशिक्षित आदिवासींनी दिले.
विशेष म्हणेचे याबाबत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्र्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांना २७ फे ब्रुवारी २०१८ रोजी या भ्रष्टाचाराची तक्रारीही करण्यात आली आहे. मात्र, यामुळे शासनाची पोलखोल होईल म्हणून हा तक्रारी अर्ज दाबून ठेवल्याचा आरोप तक्रारदारानी केला आहे.
तक्रारदारासह एकुण पाच लाभार्थ्यांचे नांवे हागणदारीमुक्तच्या यादीत समाविष्ट आहेत प्रत्यक्षात लाभ दिलेलाच नाही. यात अमोल राजू वांगड, युवराज बंडू पवार, अनिल बंडू पवार, अनिल धोंडू पवार, धोंडू पवार व अन्य यांचे पुर्वीच्या यादीत नावे समाविष्ट होती. मात्र, यांना कुठलाच लाभ देण्यात आलेला नाही. तसेच यांची नांवेही संकेतस्थळावर झळकत होती, ती आता काढुन टाकण्यात आलेली आहेत.
>संकेत स्थळावर : तातडीने बदल
तक्रारी अर्जानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणांनी संकेत स्थळाच्या अभिलेखावरुन काष्टी- सावर्डेचा आलेख बदलला असून आगोदर शंभर टक्के दाखविलेला आता ९६ टक्कयांवर आणला आहे. ग्रामसेवकाने केलेला भ्रष्टÑाचार यामुळे चव्हाट्यावर आला असला तरी प्रशासनातील अधिकाºयांनी हे प्रकरण झाकण्यासाठी तातडीने शासनाच्या वेबसाईटवरून फोटो व नांवे डिलीट केलेले आहेत. पूर्वी दाखविण्यात आलेल्या १०० % हागणदारी मुक्तीचे पेज स्क्रिनशॉट करून व यादी डाऊनलोड करण्यात आलेली असल्यामुळे अमोल यांना मॅनेज करण्यासाठी ग्रामसेवकांचे फोन सुरू असल्याची माहितीही अमोलने लोकमतला दिली आहे.
>बोगस स्वच्छता मिशनवर कारवाइ करा
शासनाच्या संकेतस्थळावर जव्हार, मोखाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती १०० % हागणदारी मुक्त असल्याचा कागदोपत्री दाखविण्यात आलेले असून याबाबतही उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामसेवकाच्या व अधिकाºयांच्या संगनमताने चालेल्या बोगस स्वच्छता मिशनवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केलेली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.