आशेरीगडावर दिली मशाल मानवंदना; पालघर जिल्ह्यातील किल्ले संवर्धन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:21 PM2021-02-20T23:21:37+5:302021-02-20T23:21:43+5:30
पालघर जिल्ह्यातील किल्ले संवर्धन मोहीम : शेकडो वर्षांनी राजसदर परिसर उजळून निघाला मशालींनी
पालघर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर संस्थेने जिल्ह्यातील आशेरीगड गडावर दोन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी दुर्गमित्र प्रतिनिधींनी व किल्ले वसई मोहीम परिवार सदस्यांनी रात्री आशेरी गडावर मुख्य राजसदर वास्तूवर मशाल मानवंदना दिली. शेकडो वर्षांनी राजसदर परिसर मशाली व भगव्या ध्वजांनी उजाळून निघाला होता.
यावेळी आशेरी देवीस्थान पूजन व संवर्धन, सजावट, ऐतिहासिक सदर स्थळ संवर्धन व मानवंदना, वास्तूमाहिती फलक लावणे, दिशादर्शक, आशेरीगड विजयदिन, दारूबंदी व प्लास्टिक बंदी जागृती मोहीम, संवर्धन व स्वच्छता मोहीम, बालेकिल्ला सदर वास्तू चौथरा पुरातत्वीय पध्दतीने डागडुजी, मशाल व भगवे ध्वज मानवंदना, इतिहास मार्गदर्शन सफर, गडमार्गावर दिशादर्शक, मुख्य मार्गांवर भगवे ध्वज, दुर्गसंवर्धन योगदान सत्कार, गडपायथा इतिहास माहिती फलक उद्घाटन इत्यादी महत्त्वाचे उपक्रम पूर्ण करण्यात आले.
१८ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सवानिमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले. १९ तारखेस सकाळी दुर्गमित्रांनी श्री आशेरी देवी मुख्य तांदळापूजन, होम, आरती उपक्रम पूर्ण केले. सकाळी राजसदर मुख्य उपक्रमात श्री राजा शिवछत्रपती मूर्तिपूजन, श्री राजा संभाजी महाराज प्रतिमा पूजन, राजसदर इतिहास मार्गदर्शन, श्री विष्णु देवतापूजन यांचा समावेश होता.
समस्त दुर्गमित्रांनी राजसदर वास्तू भगवे ध्वज, पताका, रांगोळी, भंडारा इ. सुशोभित केला होता. किल्ले वसई मोहीम परिवाराचे प्रमुख व इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी राजसदर वास्तूचे महत्त्व व छत्रपती संभाजी महाराजांची उत्तर कोकण स्वारी या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर गडावर झालेल्या इतिहास मार्गदर्शन अभ्यास सफरीत ७० दुर्गमित्र सहभागी झाले होते.