तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटकांना द्यावा लागतो जिझियाकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 12:54 AM2021-01-08T00:54:43+5:302021-01-08T00:54:54+5:30
१२ वर्षांखालील मुलांना २५, त्यावरील व्यक्तींना ४८ रुपयांचा भुर्दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : वसईतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तथा पर्यटनस्थळ असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटक तथा भाविकांना वन विभागाकडून मनमानीपणे आकारण्यात येणारा जिझियाकर आकारून मगच पुढे जावे लागते. १२ वर्षाखालील मुलांना २५ रुपये तर १२ वर्षांवरील व्यक्तींना सुमारे ४८ रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून आकारण्यात येणारा कर हा मुघल राजवटीत लावल्या जाणाऱ्या कराप्रमाणेच जिझिया करासारखा असून पर्यटकांच्या आणि भाविकांच्या खिशाला सरळसरळ कात्री लावण्याचे उद्योग वन विभागाकडून सुरू झाले असल्याने पर्यटक व भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. शासनाने ११ जानेवारीपर्यंत हा जिझिया कर बंद न केल्यास शासनाला भाविकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
वसईतील तुंगारेश्वर हे राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. दूरवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. तसेच तुंगारेश्वर पर्वतावर बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रमदेखील असून दररोज भाविकांची वर्दळ असते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आणि भाविकांची वर्दळ वाढली. मात्र या भाविकांकडून ४८ रुपयांची पावती आकारली जात असल्याने तीव्र नाराजी आहे. १२ वर्षांखालील मुलांनादेखील
या प्रवेश शुल्काचा सामना करावा लागत आहे.
आताच्या सरकारचीही मनमानी सुरु
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातदेखील अशा प्रकारे पर्यटक व भाविकांना मनमानी प्रवेश शुल्क आकारले जात होते. त्यानंतरच्या सरकारांच्या काळातही मनमानी थांबेल असा व्होरा होता, मात्र आताच्या सरकारच्या काळातही तेच उद्योग सुरू असल्याने पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.