‘एक गाव - एक होळी’ची जपली जाते परंपरा; यंदा मात्र कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:31 AM2021-03-25T01:31:56+5:302021-03-25T01:32:20+5:30

यंदा होळी सणावर कोरोना प्रादुर्भावाचे संकट असले तरी विक्रमगडच्या बुधवारच्या बाजारात मात्र नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

The tradition of 'Ek Gaav - Ek Holi' is celebrated; This time, however, the corona crisis | ‘एक गाव - एक होळी’ची जपली जाते परंपरा; यंदा मात्र कोरोनाचे संकट

‘एक गाव - एक होळी’ची जपली जाते परंपरा; यंदा मात्र कोरोनाचे संकट

googlenewsNext

राहुल वाडेकर

विक्रमगड : काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांत प्रामुख्याने ग्रामीण खेड्यापाड्यांत आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे, ओंदे, झडपोली, सजन, शिळ आदी भागांत आजही पारंपरिक पद्धतीनेच सण साजरे करण्यात येतात. या गावांत ‘एक गाव - एक होळी’ची परंपरा आजही अबाधित आहे. याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोट्या-मोठ्या होळ्या पेटवून नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात. 

यंदा होळी सणावर कोरोना प्रादुर्भावाचे संकट असले तरी विक्रमगडच्या बुधवारच्या बाजारात मात्र नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लोक नियमांचे पालन न करता वावरत असल्याचे पाहावयास मिळाले. पहिले तीन दिवस छोट्या होळ्या, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच २८ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो. या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमग्याला पारंपरिक ग्वाही देत आहे. चोरटी होळीसाठी तरुण गावातूनच लाकडे चोरून आणतात. पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते. या होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते.

गावातील नवविवाहित जोडप्यांनी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पद्धत आहे. त्यानंतर होळी पेटविली जाते. होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडते. साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार लहान मुले होळीच्या दिवशी गळ्यात घालतात. दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते, त्या जागेला ‘होळीची माळ’ असे म्हणतात. याच माळावर पाच दिवस विविध खेळ, गरबा नृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम, तर ग्रामीण खेड्यापाड्यांवर तारपा नृत्य, ढोलनाच, लेजीम व सामूहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर खेळले जातात.

मनसोक्त धुळवड 
होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या केल्या जातात. धूलिवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते, तर रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंगच वापरले जातात. दरम्यान, होळीसाठी सद्य:स्थितीत विक्रमगड बाजार फुललेला असून, आजूबाजूच्या खेड्यावरील लोक बाजाराप्रमाणे चार दिवस गर्दी करीत असून पोस्त मागण्याकरिता वेगवेगळ्या वेशात फिरत आहेत.

Web Title: The tradition of 'Ek Gaav - Ek Holi' is celebrated; This time, however, the corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.