आदिवासी तरुणाचे पारंपरिक हस्तकला कौशल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:12 AM2020-02-02T00:12:16+5:302020-02-02T00:12:47+5:30
हस्तकलेला मार्केट नाही, शासनाची उदासीनता, सरकारने दखल घेण्याची केली मागणी
- हुसेन मेमन
जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा म्हटला की, समोर उभे राहते ती बेरोजगारी. स्थलांतर आणि कुपोषण या येथील गंभीर समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी सरकार प्रत्येक हाताला काम, घराघरात रोजगार अशा घोषणा करीत आहे. तर येथील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार हमी योजना सुरू आहेत. मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे या योजनेचाही पाहिजे तसा फायदा झालेला नाही. मात्र यावर मात करत एका आदिवासी तरुणाने आपल्या अंगी असलेली पारंपरिक हस्तकला जोपासली आहे.
जव्हार तालुक्यातील रामखिंड गावातील भगवान कडू याने घरातच स्टुडिओ बनविला आहे. हा आदिवासी तरुण बोहडा या उत्सवासाठी ५२ देवांचे मुखवटे तयार करतो. या हस्तकलेतून सोंगे, देवदेतांचे मुखवटे, पाळीव प्राणी, तारपा, घरातील संसारोपयोगी साहित्य बनविले जात आहे. ही वडिलोपार्जित हस्तकला आपण जोपासत असल्याचे त्याने सांगितले. परंतु हस्तकलेला मार्केट नसल्याची खंत व्यक्त केली असून, या हस्तकलेची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र या बाबतीत शासनाची उदासीनता दिसून येत आहे.
भगवान कडू यांनी आपल्या वडिलांकडून ही मुखवटे तयार करण्याची कला जोपासली आहे. भगवान कडू यांची पत्नी व मुलेही त्यांना ही कला जोपण्यास मदत करीत आहेत. रद्दी कागदाच्या लगद्यापासून आकर्षक मूर्ती तयार करून त्यांची विक्री हे कुटुंब करीत आहे.
विशेष म्हणजे भगवान कडू हे एका हाताने अपंग असूनही मूर्तींना सुबक आकार देत आहेत. या मूर्ती बनविण्यासाठी जंगलातील चेरी झाडाची साल पाण्यात भिजवून डिंक तयार केला जातो. त्या साहित्याचा वापर करून देवाच्या मूर्तीसह कासव, हरीण असे अनेक प्राणीही साकारले जातात.
हरीण, सांबर, बकरी, वाघ मुखवटा, सूर्यनारायण, दळण दळणारी महिला, तीर कमान चालविणारा पुरुष, कासव, गणपती, असे आकर्षक मुखवटे बनवीत आहे. तारप्याचे विविध आकर्षक प्रकार, गौतम बुद्ध, जाती अशा अनेक प्रकारच्या हुबेहूब मर्ू्त्या साकारल्या जात आहेत.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात उपजत कलेच्या विकासाला फारसा वाव नव्हता. बनविलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ नव्हती. कडू बांधवांना व्यवसाय वाढीसाठी अर्थसहाय्याची गरज होती. परंतु या कलाकारांकडे ना शेती होती ना वडिलोपार्जित संपत्ती.
या विपरीत परिस्थितीत भगवान कडू यांना तत्कालीन ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कर्ज मिळाले. त्या माध्यमातून सरकारकडून भरविल्या जाणाºया विविध प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला. तिथे या मूर्ती विकून हातात पैसा येऊ लागला. त्यांनी मिळालेल्या अर्थसहाय्याची परतफेड केली, मात्र तरीही कालांतराने या कलाकाराकडे दुर्लक्ष होत गेल्याचे दु:ख कडू यांनी व्यक्त
केले आहे.