जिल्ह्यात होळीला चढला पारंपरिक साज; रस्त्यारस्त्यांवर धुळवडीचा रंगोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:03 AM2024-03-26T11:03:12+5:302024-03-26T13:05:48+5:30
वसई-विरारमध्ये होळीसह धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली.
पारोळ : लोकल ट्रेनमध्ये तुरळक प्रवासी... प्लॅटफॉर्म रिकामे... रस्त्यांवर शुकशुकाट... बंद असलेल्या रिक्षा-दुकाने...वाहनांची थांबलेली वर्दळ...असे बंदसदृश चित्र सोमवारी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यात पाहायला मिळाले. जिथे-तिथे फक्त रंगलेले चेहरे...फुगे आणि पिशव्यांचा रस्त्यावर पडलेला खच... रंगीत पाण्याचा चिखल दिसत होता. दरम्यान, वसई-विरारमध्ये होळीसह धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली.
होळी, रंगपंचमीच्या दोन दिवसांत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात व समुद्रकिनारा परिसरात नाकाबंदी, तपासणी सुरू होती. यामुळे कोणताही गैरप्रकार न होता शांततेत धुळवड पार पडली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिस सज्ज होते.
वसई तालुक्यात रविवारी पारंपरिक पद्धतीने होळी वाजतगाजत, नाचत आणून रात्री होळीचे दहन करण्यात आले. ग्रामीण भागात जुन्या पद्धतीने होलिकोत्सव साजरा झाला तर शहरातील हौसिंग सोसायट्यांमध्येही होळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. होळी उत्सव साजरा करताना रात्रीच धुळवडीला आरंभ झाला. रंगपंचमीचा खरा उत्साह सोमवारी सकाळपासून पाहायला मिळाला. धुळवड असल्याने सर्वच दुकाने, रिक्षा बंद होत्या. त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना याची-त्याची मदत घेऊन वाहन मिळवावे लागले.
सकाळपासून रस्त्या-रस्त्यांवर, घरांच्या अंगणात व हौसिंग सोसायट्यांमध्ये धुळवडीचा उत्साह दिसत होता, तर ग्रामीण भागात होळीचे पोस्त मागण्याची परंपरा असल्याने अनेकजण सोंग घेत पोस्त मागताना दिसत होते. आबालवृद्ध, महिला तरुण सर्वच जण रंगात न्हाऊन निघाले होते. अनेक ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळाले. काही इमारतींमध्ये डीजे, रेन डान्स अशी खास सोय केली गेली होती. रंगमपंचमी खेळून झाल्यानंतर एकत्रित भोजनाचा आनंदही ठिकठिकाणच्या रहिवाशांनी घेतला.
सोसायट्यांच्या आवारात, रस्त्यांवर, अंगणात रंगीबेरंगी उत्साही चेहरे बघायला मिळत होते. त्यामुळे रस्त्यावर ‘बंद’ची स्थिती होती. वसईच्या कोळीवाड्यांमध्ये होळी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. तिथेही उत्साहाचे वातावरण होते, तर सप्तरंग व पाण्याची उधळण, डीजेचा आवाज या आवाजावर थिरकणारी तरुणाई अशा वातावरणात वसई, शहरी व ग्रामीण भागात दिसत होती. होळीची गाणी गात, गुलाल उधळत काहींनी होळी साजरी केली. शहरातील चहाच्या टपऱ्या, खाद्य पदार्थांची दुकाने बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले.