वसई तहसील अधिकाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई, बेकायदेशीर पाट्या काढायला लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:30 AM2022-11-25T11:30:39+5:302022-11-25T11:30:52+5:30
नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई वाहतूक विभागाने गुरुवारी धडक मोहिम हाती घेत तहसीलदार कार्यालयामधील शासकीय अधिकाऱ्याच्या खाजगी गाड्यांवर दंडात्मक ...
नालासोपारा (मंगेश कराळे) :-
वसई वाहतूक विभागाने गुरुवारी धडक मोहिम हाती घेत तहसीलदार कार्यालयामधील शासकीय अधिकाऱ्याच्या खाजगी गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली.वसई तहसिलदार कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच अशी कार्रवाई करण्यात आली आहे. या कारवाईचं सर्वसामान्य नागरिकांनी जल्लोशात स्वागत केले आहे.
अधिक माहिती नुसार, वसई वाहतूक विभागात दाखल तक्रारी नुसार पुरवठा निरीक्षक रोशन कापसे हे खाजगी चार चाकी गाडीला 'महाराष्ट्र शासन' ही बेकायदा पाटी लावतात. तसेच त्याच गाडीतुन वसूलीही करतात असा आरोप निवेदनातुन करण्यात आला आहे. यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तहसीलदार कार्यालयाला भेट दिली असता पुरवठा विभागाच्या अन्य चारचाकी गाडी वरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. पुरवठा अधिकारी कापसे यांची गाडी क्रमांक एम एच ३६ एच ७६०१ व अरुण मूर्तडक अव्वल कारकुन यांची एम एच ५० डीएम ५२१० या दोन खाजगी गाड्या आढळून आल्या. यावर महाराष्ट्र शासन अश्या बेकायदा पाट्या लावण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय वहानावरच असे लिहिण्यास मुभा असते. त्याचे उल्लंघन करून अधिकारी ग़ैरवापर करतात.
एरव्ही सर्वसामान्य नागरिकांना त्वरित दंड आकारला जातो. मात्र या कारवाईस तब्बल तीन तासांचा अवधी लागला. अधिकाऱ्यांचे म्हणणेही पोलिसांनी विचारले. त्यानंतर दुपारी २ वाजता प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. पोलिसांनी तहसीलदार कार्यालयात प्रवेश करून प्रथमच अश्या स्वरूपाची कारवाई केली. हा दंड छोट्या स्वरूपाचा असला तरीही संबधीत अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेवर यामुळे शेरा बसणार आहे. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातुन शिस्त भंगाची कारवाई करण्याची लटकती तलवार राहणार आहे.
तहसिलदार कार्यालयातील पुरवठा विभाग मागील काही वर्षापासून विविध कारणामुळे चर्चेत आहे. या विभागातुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याच्या तक्रारी आधीच दाखल आहेत. असे असताना सदर खाजगी महागड्या गाड्या विकत घेऊन त्यातून व्यवहार केले जात असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी शासकीय पाटी लावल्या जातात असा प्रमुख आरोप आहे. या दंडात्मक कारवाई नंतर सदर पाट्या काढल्या गेल्या नाही तर दंडाची रक्कम तिप्पट करण्याची तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर पद्धत आहे. अशी माहिती वाहतूक शाखे कडून देण्यात आली. यापुढच्या टप्प्यात वसई विरार मनपाच्या खाजगी गाड्यांवर कारवाईची शक्यता आहे.
१) अधिकाऱ्यांच्या गाडीची चाचपणी करुनच कारवाई केली जाईल. बेकायदेशीर असेल तर वहातुक विभाग कारवाई करेल. - सागर इंगोले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग वसई)