पिंजाळी नदीच्या पुलावरून पावसाळ्यापूर्वीच वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:36 AM2020-06-29T03:36:34+5:302020-06-29T03:36:38+5:30
गतवर्षी महापुरात वाहून गेला होता पूल : ५० दिवसांत पूर्ण केले काम
विक्रमगड : गेल्या वर्षी ४ आॅगस्टच्या मुसळधार पावसामुळे पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथील या नदीवरील निम्मा पूल वाहून गेला होता. तेथे तात्पुरता माती भराव टाकून वाहतूक सुरू केली होती. मात्र, हा भराव पावसात वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती होती. प्रशासनाने हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्याने या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. या पुलाचे २५० फूट नवीन बांधकाम अवघ्या ५० दिवसांत पूर्ण करण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
वाडा-मलवाडा-जव्हार या राज्य मार्गावरील हा पूल वाहून गेल्यामुळे या परिसरातील १५ ते २० गावांचा विक्र मगड-वाडा तालुक्यांशी संपर्कतुटला होता. यामध्ये शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे हाल होत असल्याने तुटलेल्या भागात मातीचा भराव टाकून वाहतूक सुरू केली. मात्र, त्यानंतर चार महिले उलटूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष
केले होते.
पुलाचा माती भराव काढून या ठिकाणी नव्याने अधिक गाळे वाढवून पुलाची लांबी वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या तुटलेल्या पुलाची लांबी वाढवण्यासाठी १० मीटरचे ७ गाळे व १० मीटर संरक्षक भिंत असे एकूण २५० फुटांचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी ३७ लाखांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांनी एप्रिल २०२० मध्ये काढली होती. या कामाचा ठेका विक्रमगड येथील मे.जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रा. लिमिटेड या कंपनीने घेऊन अवघ्या ५० दिवसांत या पुलाचे काम पूर्ण केले.