डहाणूत अवैध पार्किंगमुळे होते वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:08 PM2019-12-20T23:08:02+5:302019-12-20T23:08:08+5:30

दंडात्मक कारवाई औटघटकेची : शहरवासीयांचा जीव मेटाकुटीला; वेळीच कारवाई करण्याची मागणी

Traffic was caused by illegal parking in the area | डहाणूत अवैध पार्किंगमुळे होते वाहतूककोंडी

डहाणूत अवैध पार्किंगमुळे होते वाहतूककोंडी

googlenewsNext

शौकत शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : डहाणू रोड रेल्वे स्थानकाबाहेरच्या मुख्य रस्त्यावर, असंख्य विनापरवाना बेशिस्त वाहनांनी रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग सुरू केले आहे. तसेच फळे, भाजीपाला विक्रेते व फेरीवाल्यांनी डहाणू शहरवासीयांचा जीव मेटाकुटीला आणला आहे. या अवैध पार्किंगविरुद्ध पोलिसांनी हाती घेतलेली दंडात्मक मोहीमही औटघटकेची ठरली आहे.
डहाणू पोलीस ठाण्याच्या बाहेरचा थर्मल पॉवर रस्ता, रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता, इराणी रोड आणि सागरनाका या रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे पार्किंग करून ठेवलेल्या वाहनाविरुद्ध, डहाणू पोलिसांनी दंडात्मक मोहीम उघडून, ८० हजारांचा दंडही वसूल केला होता, मात्र थोड्याच दिवसात ही मोहीम बारगळली आणि अवैद्य वाहनतळांनी डोके वर काढले आहे.
शहरातील रस्त्याच्या बाजूला अवैधपणे पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांमुळे महिला, वयोवृद्ध नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांना रस्ता ओलांडण्यासाठी जोखीम पत्करावी लागत आहे. डहाणू परिसरात फेरीवाले, हातगाडीवाले, फळे भाजीपाला विक्रेते आणि रिक्षावाल्यांनी मुख्य रस्ते अडवले आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वापार असलेले भाजी मार्केट काही वर्षांपूर्वी डहाणू नगरपरिषदेने तोडून, त्यातील काही जागा दोन रिक्षातळांसाठी दिली होती, मात्र रिक्षाचालक या जागेवर चार चार रिक्षा लावून मुख्य रस्ताच अडवत आहेत. शिवाय रेल्वे गाडी येण्याच्या वेळी, हे रिक्षाचालक रेल्वे फाटकातच घोळका करून राहात असतात. त्यामुळे संपूर्ण रस्ताच अडवला जातो आणि प्रवाशांना त्याचा त्रास भोगावा लागतो.
याबाबत डहाणू नगरपरिषदेकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. येथील मुख्य रस्त्यावर काही नोकरदार मंडळी बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करून बिनदिक्कत कामावर जात असतात. त्याचप्रमाणे फेरीवाले, हातगाडीवाले तसेच काही वाहने मनमानीपणे उलट-सुलट पार्किंग करून ठेवलेली असतात. या असंख्य वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे, डहाणूहून कासा, चारोटी, महालक्ष्मी, चिंचणी, कोसबाड, घोलवड अशा अनेक गावांत जाणाऱ्या सुमारे हजार रिक्षा आहेत. यातील २० टक्के रिक्षा विनापरवाना बेकायदेशीरपणे चालत आहेत. प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालकांत स्पर्धा चालत असल्याने अनेकदा अपघात होतात.

Web Title: Traffic was caused by illegal parking in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.