मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ निरीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 08:42 PM2023-01-11T20:42:50+5:302023-01-11T20:44:17+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या १० जानेवारी रोजी करण्यात आल्या आहेत. ...
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या १० जानेवारी रोजी करण्यात आल्या आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यां मधील घोडेबाजार थांबवल्याची चर्चा होती. तसेच अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु एका पोलीस अधिकाऱ्याने बदलीसाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत वशिला लावला असताना देखील दाते यांनी मात्र त्या अधिकारयांसह अन्य बदल्या सुद्धा केल्या नसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
दाते यांची बदली झाल्यानंतर पोलीस आयुक्तपदी मधुकर पांडे यांची नियुक्ती झाली आहे. नवीन वर्षात आता प्रलंबित बदल्यांची सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने बदल्या केल्या गेल्याचे आदेशात नमूद केले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांची पेल्हार पोलीस ठाण्यात तर पेल्हारचे पोलीस निरीक्षक अमर मराठे यांची अमली पदार्थ विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक देविदास हंडोरे यांची मीरा भाईंदर वाहतूक शाखेत नियुक्ती केली आहे. नियंत्रण कक्षातील निरीक्षक संदीप कदम यांची काशीमीरा पोलीस ठाण्यात तर काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांना परवाना शाखेत नेमले आहे.
उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी यांची विरार वाहतूक शाखेत तर विरार वाहतूक शाखेचे निरीक्षक दादाराम कारंडे यांची उत्तन सागरी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. परवाना शाखेतील निरीक्षक रणजित आंधळे यांची वसई पोलीस ठाणे प्रभारी तर वसईचे कल्याणराव करपे यांची अर्नाळा पोलीस ठाणे प्रभारी म्हणून बदली केली आहे. अर्नाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजू माने यांची नियंत्रण कक्षात बदली केली गेली आहे.
नियंत्रण कक्षातील शैलेंद्र नगरकर यांची तुळींज पोलीस ठाणे प्रभारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे. तर तुळींजचे राजेंद्र कांबळे यांच्यावर विरार पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विरार पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश वराडे यांची विशेष शाखेत बदली केली आहे. नव्याने मुंबई शहर वरून बदली होऊन आलेले प्रवीण कदम व पुणे ग्रामीणमधून बदली होऊन आलेले अरविंद चौधरी यांना तूर्तास नियंत्रण कक्षात नियुक्त केले गेले आहे.