वसईत एसटी की परिवहन सेवा ?
By admin | Published: March 20, 2017 01:53 AM2017-03-20T01:53:21+5:302017-03-20T01:53:21+5:30
१ एप्रिलपासून एसटी महामंडळ वसईतील शहरी सेवा पूर्णपणे बंद करणार असून जागा मिळाली तरच महापालिका परिवहनच्या बसेस सुरु
वसई : १ एप्रिलपासून एसटी महामंडळ वसईतील शहरी सेवा पूर्णपणे बंद करणार असून जागा मिळाली तरच महापालिका परिवहनच्या बसेस सुरु करणार आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार एसटी महामंडळ वसई आणि नालासोपारा आगारातून सुटणाऱ्या शहरी बसेस बंद करणार आहे. तसे अखेरचे पत्र महामंडळाने महापालिकेला दिले आहे. मात्र, महापालिकेने विरार, नालासोपारा, नवघर आणि वसई े येथील एसटी स्थानकाच्या जागा भाडेतत्वावर मिळाल्या तरच बसेस सुरु करू असा, पवित्रा घेतला आहे. एसटी आणि महापालिका अधिकाऱ्यांची त्यासंदर्भात पहिली बैठक शनिवारी पार पडली. एसटीने सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र सोमवारी एसटीचे अधिकारी वसईत जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. जागा देण्यासंबंधीचा निर्णय सोमवारच्या भेटीनंतर एसटी महामंडळ घेणार आहे. त्यासाठी मंगळवारी दुसरी बैठक होणार आहे. त्यात महामंडळाने जागा देण्यास नकार दिला तर मात्र महापालिका बसेस सुरु न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, एसटीच्या निर्णयाविरोधात जनआंदोलनाच्या नेत्या डॉमणिका डाबरे आणि सातवीत शिकणाऱ्या शारियन डाबरे या विद्यार्थ्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. वसईतील शेकडो विद्यार्थ्यांना सहा सात किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जावे लागते आहे. त्यामुळे त्या बंद करण्यात येऊ नये अशी मागणी शारियनने केली आहे. तर वसईतील हजारो महिला पहाटे चार वाजल्यापासून घराबाहेर पडतात. इतक्या पहाटे फक्त एसटीच सुविधा देत आहे. एसटीच्या २५ मार्गावर दिवसाला ६२२ फेऱ्या होतात. स्वस्त, सुरक्षित आणि हमखास वाहतुकीचे साधन म्हणून एसटीला पर्याय नाही. त्यामुळे तिची शहर बससेवा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी डॉमणिका डाबरे यांनी केली आहे. (वार्ताहर)