परिवहन व्हेंटिलेटरवर

By admin | Published: August 6, 2015 11:28 PM2015-08-06T23:28:40+5:302015-08-06T23:28:40+5:30

पालिकेने २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने प्रशासन नवीन

Transport on ventilator | परिवहन व्हेंटिलेटरवर

परिवहन व्हेंटिलेटरवर

Next

भार्इंदर : पालिकेने २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने प्रशासन नवीन ठेकेदाराच्या शोधात आहे. तर, विद्यमान ठेकेदाराने पालिकेकडेच ४२ कोटी थकीत बाकी असल्याचा दावा केला आहे.
पालिकेने २००५ मध्ये कंत्राटी पद्धतीवर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा सततच्या तोट्यामुळे बंद करून ९ आॅक्टोबर २०१० रोजी रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी पीपीपी तत्त्वावरील सेवा सुरू केली. पूर्वीचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आल्यानंतर नवीन ठेका उल्हासनगरमधील केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला दिल्याने करारात नमूद केल्याप्रमाणे परिवहन सेवेच्या आगाराची जागा राजकीय उदासीनतेत अद्याप अडकलेलीच आहे. नवीन सेवेच्या मागणीनुसार २५० बसपैकी पहिल्या टप्प्यात ५० बस पालिकेला देण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १०० बस येण्याच्या मार्गावर आहेत. एकूण १०२ बसवर सुरू करण्यात आलेल्या सेवेतील ५० मुदतबाह्य ठरलेल्या बस ठेकेदाराने मे २०१२ मध्ये भंगारात विकल्या. उर्वरित बस दोन वर्षांनंतरच तांत्रिक अडचणीत अडकू लागल्याने प्रशासनासह बस कंपनीने वॉरंटी मुदतीतही बसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे सुमारे २० ते २५ बस विनाचाकाच्या दयनीय अवस्थेत रस्त्यावरच उभ्या असून उर्वरित २५ ते ३० बस सध्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहेत. त्यातीलही अनेक बस योग्य दुरुस्तीअभावी रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने त्रस्त प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या बोरिवली व ठाणे यासारख्या लांब पल्ल्यांचे मार्गही ठेकेदाराने बंद केल्याने सुमारे ४५० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना नारळ देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ठेकेदाराने पालिकेला देय असलेली सुमारे ७० ते ८० लाखांची रॉयल्टी थकविल्यासह असमाधानकारक सेवा देणाऱ्या ठेकेदाराला नारळ देण्यासाठी प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याउलट, ठेकेदाराने पालिकेकडेच ४२ कोटी थकीत असल्याचा दावा केला आहे. याबाबत, परिवहन सेवेच्या अधिकारी कल्पिता वडे-पिंपळे यांनी सांगितले की, ठेकेदाराचा दावा तपासून नवीन सेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने लवादाची स्थापना केली आहे. तर, ठेकेदार कंपनीचे संचालक राजा गेमनानी यांनी सांगितले की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार सुरू असून कंपनीची थकीत रक्कम मिळण्यासाठी लवादाकडे पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Transport on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.