परिवहन कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार; वर्षभरापासून पगार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:55 PM2020-01-15T23:55:48+5:302020-01-15T23:56:04+5:30
बुधवारी पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी पुकारला संप; वाहतुकीवर फार परिणाम नाही
नालासोपारा : वर्षभरापासून पगार मिळाला नसल्याने वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या चालक आणि वाहकांनी बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून संप पुकारला. परिवहन विभागातील तीनही संघटनांतील ९०० कामगारांनी एकत्र येऊन हा संप पुकारत सर्व बसेस बंद ठेवल्याने एकही बस वसई तालुक्यात रस्त्यावर धावली नाही.
महानगरपालिकेने परिवहन विभागातील हिरव्या पिवळ्या बसेस हद्दीत चालवण्यासाठीचे कंत्राट भागीरथी ट्रान्सपोर्टला दिले आहे. परिवहनकडे १६० बसेसचा ताफा असून १४० बसेस शहरात चालवल्या जातात. यावर काम करणारे ९०० चालक आणि वाहक यांना वर्षभरापासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. पीएफचे पैसे अजून जमा केलेले नाही, सहा महिन्याला ५०० रुपये प्रमाणे वाढणारा पगार तीन वर्षांपासून वाढलेलाच नाही, अशा अनेक कारणांवरून कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन करत संपाचे हत्यार उपसले. याआधी दोन वेळा संप पुकारला होता पण आयुक्त आणि कंत्राटदार यांनी आश्वासन दिल्यावर संप मागे घेतला होता. यावेळी मात्र, सर्व कामगारांनी जोपर्यंत पगार खात्यात किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत संप मिटवणार नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले आहे.
वसई पश्चिमेकडील डेपोमध्ये हे कामगार आंदोलन करत असून मध्यस्थी करण्यासाठी भागीरथी ट्रान्सपोर्टचे संचालक मनोहर सकपाळ आले होते. ते एका कामगाराला जोरात बोलल्याने सर्व कर्मचारी त्यांच्यावर भडकले. आणि सकपाळ यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. याबाबत सकपाळ यांना संपर्क केला तर त्यांनी फोन उचलला नाही.
परिवहनच्या कामगारांनी पगार जास्त मिळावा म्हणून संप पुकारला आहे. यामुळे परिवहन सेवेच्या बसेस बंद आहे. कंत्राटदार आणि कामगारांमधील हा वाद आहे. त्यांचे पगार महानगरपालिका देत नसून कंत्राटदार देतो. संपामुळे महानगरपालिकेचे नुकसान झाले नसून त्या कंत्राटदारांचे झाले आहे. - प्रितेश पाटील, सभापती, परिवहन विभाग, वसई विरार महानगरपालिका
वर्षभरापासून पगार नाही, पीएफ नाही, सहा महिन्याला होणारी इन्क्रीमेंट ३ वर्षांपासून थकीत, सोसायटीमधून लोन देणार म्हणून सोसायटी बनवली पण लोनसुद्धा वेळेवर नाही यामुळे सर्व नाराज चालक आणि वाहक ९०० कामगारांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत पगार खात्यात किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही. - सोमनाथ गायकवाड, चालक