परिवहनचे कामगार पुन्हा संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:36 AM2017-08-19T03:36:58+5:302017-08-19T03:37:01+5:30
चर्चेत मान्य केल्यांतरही दहा बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यास ठेकेदाराने आयत्यावेळी नकार दिल्याने परिवहन सेवेच्या कामगारांनी गुुरुवारी रात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन केले.
वसई : चर्चेत मान्य केल्यांतरही दहा बडतर्फ कामगारांना कामावर घेण्यास ठेकेदाराने आयत्यावेळी नकार दिल्याने परिवहन सेवेच्या कामगारांनी गुुरुवारी रात्रीपासून पुन्हा काम बंद आंदोलन केले. गुरुवारी रात्रीपर्यंत कोणताचा तोडगा न निघाल्याने परिवहनची बससेवा बंद होती.
वसई विरार महापालिकेच्या ठेका पद्धतीवर चालत असलेल्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. बुधवारी रात्री मागण्या मान्य झाल्याने कामगारांनी बंद मागे घेत काम सुरु केले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फ करण्यात आलेल्या दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्यावरून वाद सुरु झाला होता. बुधवारच्या चर्चेत आयुक्त सतीश लोखंडे यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, गुरुवारी ठेकेदाराने बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरु केले.
शुक्रवारीही काम बंद आंदोलन सुरुच राहिल्याने शहरातील बससेवा ठप्प झाली होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी , आयुक्त आणि ठेकेदारांमध्ये चर्चेच्या फेºया झाल्या. मात्र, बडतर्फ कामगारांची चौकशी करूनच त्यांना कामावर घेतले जाईल, अशी भूमिका ठेकेदार आणि प्रशासनाने कायम ठेवली. तर संघटनेने कामगारांना कामावर घेतल्याशिवाय बस सेवा सुरु करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावर कोणताच तोडगा न निघाल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत संप सुरु होता.
>हा तर आडमुठेपणा
बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी शाळेत जाता येत नसल्याने महापालिका मुख्यालयाबाहेर बसून होते. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आणि पालक यांना घेऊन आयुक्तांशी चर्चा केली. शालेय बस वाहतूक सुरु करा. संघटनेचे कामगार फुकट काम करतील अशी भूमिका संघटनेने घेतली होती. पण, तीही प्रशासनाने धुडकावून लावल्याचे विवेक पंडित म्हणाले.