ट्रॉमा हाॅस्पिटलचे काम संथगतीने; मनोरमध्ये तीन वर्षे काम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 11:22 PM2021-04-26T23:22:53+5:302021-04-26T23:22:59+5:30
आरिफ पटेल मनोर : मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत मनोर जवळ टाकव्हल येथे सुरू असलेला ट्रॉमा हाॅस्पिटलचे काम खूपच संथगतीने ...
आरिफ पटेल
मनोर : मुंबई - अहमदाबाद महामार्गालगत मनोर जवळ टाकव्हल येथे सुरू असलेला ट्रॉमा हाॅस्पिटलचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. हे रुग्णालय तयार असते तर कोरोना आजाराचे २०० रुग्ण एकाच ठिकाणी दाखल करून त्यांच्यावर उपचार करता आले असते आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ थांबली असती, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी व इतर समाजातील लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर करून २०० खाटांच्या टाकव्हल येथील ट्रॉमा हॉस्पिटलचे काम सुरू केले. गेल्या तीन वर्षांपासून हे काम अद्याप सुरूच आहे. या हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आरोग्य मंत्री व इतर मंत्र्यांनी हजेरी लावली. काम लवकर करा, अशाही सूचना दिल्या, परंतु काम कासव गतीने सुरू आहे.
आज पालघर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सरकारी दवाखाने अपुरे पडतात म्हणून खासगी दवाखाने ताब्यात घेऊन दाखल रुग्णांचे उपचार सुरू आहेत. तरी सुद्धा रुग्णांना ठेवण्यासाठी जागा नाही. सुविधा उपलब्ध करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला ॲडमिट करण्यासाठी सर्वत्र धाव घेत आहेत. शासनाची एवढी मोठी इमारत मंजूर असून तिचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर पालघर जिल्ह्यातील दोनशे रुग्ण एकाच वेळा ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार झाले असते. सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी कामाला लागली असती.
दरम्यान, कोरोनाला एक वर्ष उलटले तरी स्थानिक आमदार, खासदार यांनी सुद्धा या हॉस्पिटलचे काम लवकर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला जात आहे. आज हे रुग्णालय तयार असते तर रुग्णांना त्याचा लाभ झाला असता, असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, पालघरचे प्रभारी सिव्हिल सर्जन केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.