डहाणूत ग्रामपंचायतींच्या तिजोरीत ठणठणाट; पाणी, घरपट्टीसह इतर कर भरण्याकडे ग्रामस्थांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:22 PM2021-02-21T23:22:11+5:302021-02-21T23:22:18+5:30

पाणी, घरपट्टीसह इतर कर भरण्याकडे ग्रामस्थांची पाठ

In the treasury of the gram panchayat in Dahanu | डहाणूत ग्रामपंचायतींच्या तिजोरीत ठणठणाट; पाणी, घरपट्टीसह इतर कर भरण्याकडे ग्रामस्थांची पाठ

डहाणूत ग्रामपंचायतींच्या तिजोरीत ठणठणाट; पाणी, घरपट्टीसह इतर कर भरण्याकडे ग्रामस्थांची पाठ

googlenewsNext

शौकत शेख

डहाणू : डहाणू तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून विविध विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असल्याने बहुसंख्य ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे बहुसंख्य ग्रामस्थांची नोकरी व व्यवसाय बंद आहेत. त्यातच हातावर पोट भरणाऱ्या आदिवासींची तर दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी सगळ्यांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य रहिवाशांनी ग्रामपंचायतीचे पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती इत्यादी कर वर्षभरात न भरल्याने येथील ग्रामपंचायतींच्या तिजोरीत ठणठणाट झाला आहे.

पाच लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात ८५ ग्रामपंचायती असून ५५ ग्रुप ग्रामपंचायती आहे. तर ९ ग्रामपंचायतीची निवडणूक न झाल्याने त्याच्यावर सध्या प्रशासक आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागात संमिश्र लोकवस्ती आहे. तर जंगलपट्टी भागात ९० टक्के आदिवासी समाजाची वस्ती आहे.

येथील खेडोपाड्यात ग्रामपंचायतअंतर्गत स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य इ. नागरी सुविधा दिल्या जातात. वरील सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीला दैनंदिन कामासाठी कर्मचारी ठेवावे लागतात. या सर्वाचा खर्च घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती, डोनेशन इ. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून केला जातो. तर रस्ते, समाज मंदिर, अंगणवाडी, शौचालय इ. विकासकामांसाठी पेसा, वित्त आयोग, मुद्रांक शुल्क, नागरी जनसुविधा इ. शासकीय योजनेतून केला जातो.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून कोरोनासारख्या आजाराने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. तिथे ग्रामपंचायतीचे कर भरता येणे शक्यच नव्हते. वर्षभर ग्रामपंचायतीचे विविध कर ग्रामस्थांना भरता आले नाहीत. त्यातच शासनाकडून विविध योजनेअंतर्गत मिळणारा निधी कोरोनामुळे प्राप्त न झाल्याने मूलभूत सुविधांवरही परिणाम झालेला आहे.

डहाणूच्या दुर्गम भागातील ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना तर सहा सहा महिने पगारदेखील देण्यात आलेला नाही. नुकतेच डहाणू तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला पिण्याच्या पाण्याचे बिल न भरल्याने पाणीपुरवठा विभागाने चिंचणी ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती.

Web Title: In the treasury of the gram panchayat in Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.