बोईसरच्या उड्डाणपुलाला झाडांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:14 AM2017-08-07T06:14:28+5:302017-08-07T06:14:28+5:30
पंकज राऊत
बोईसर : पश्चिम रेल्वेवरील उड्डाण पूलाच्या पूर्व व पश्चिम भागातील दोन्ही भिंती विविध प्रकारच्या असंख्य झाडांनी व्यापल्याने पूलाच्या स्ट्रक्चरला झाडांच्या मुळांमुळे धोका उद्भवू शकतो. मात्र तरीही उगवलेल्या झाडांबाबत एमआयडीसी प्रशासनाची उदासीनता दिसत आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्र, भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि बोईसर सह तारापूर एमआयडीसी ते मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया प्रमुख रस्त्यावरील या उड्डाण पुलावरून चोवीस तास प्रतिदिन हजारो वाहनांची ये- जा होत असते. त्यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण प्रचंड मोठया प्रमाणात आहे. या सर्व उद्योगातील उत्पादनांची व प्रकल्पांची आर्थिक नाडी व पश्चिम रेल्वे हे या पूलाच्या सुरक्षेवर अवलंबून आहे
वड, पिंपळ, उंबर, बाभूळ आणि जंगली इत्यादी झाडाझुडपांच्या मुळांची जसजशी वाढ होईल तशी ती पूलाच्या बांधकामामध्ये खोलपर्यंत जाऊन त्याचे स्ट्रक्चर खिळखिळे करू शकतात. दुर्दैवाने पूलाचे स्ट्रक्चर खचलेच तर वाहतुकीस धोका उद्भवू शकतो असे असतानाही एमआयडीसीचे अधिकारी ही शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याची वाट तर पाहत नाही ना? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. पुलाच्या पश्चिम भागातील बिरसा मुंडा चौका पासून टीमा हॉस्पिटलपर्यंतच्या उजव्या बाजूला रानटी झाडे व वेला बरोबर १ बोर, १ बाभूळ, १ आपटा तर डीसी कंपनी ते खैरापाडा मैदान रस्ता म्हणजे पुलाच्या डाव्या बाजूस १ पिंपळ, ३ उंबर, ५ रु ई, ६ बोर, ५ वड, १ जंगली झाडे उगवली आहेत तर पूलाच्या पूर्व बाजूला रेल्वे फाटक ते सोनल ट्रान्सपोर्ट खैराफाटक गाव (खाली) डावी बाजूस ८ पिंपळ, ६ बोर, २ वड, १ उंबराची झाडे उगवली असून, अधिकारी ट्रान्सपोर्ट ते खैरापाडा ग्रामपंचायत रोड या उजव्या बाजूस ६ पिंपळ, २ वड, १ उंबर, ब्रीजच्या वर ७ पिंपळ इत्यादी झाडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ही झाडे आज लहान दिसत असली तरी ती दिवसेंदिवस मोठी होऊन पुलाला धोका निर्माण करू शकतात. मागील वर्षी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा खाडीवरील जुन्या पुलाच्या गर्डरला मोठा तडा गेल्याने सप्टेंबर २०१६ पासून त्या पुलावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. त्यामुळे लाखो वाहनचालकांना कितीतरी महिने पूलाच्या दुतर्फा तासनतास खोळंबून रहावे लागत होते ही घटना ताजी आहे नियमित स्ट्रक्चरल आँडिट करून त्या पुलाची वेळेवर देखभाल दरुस्ती आणि डागडुजी न केल्याने सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागला. ही वेळ दुर्लक्षानेच आली होती याचे भान प्रशासनाने ठेवल्यास अनर्थ टळेल.
पुलाच्या भींतीवरील झाडाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्या झाडांच्या मुळापासून पुलाला धोका उद्भवू शकतो त्यामुळे उगवलेली ही झाडे त्वरीत कापून पुलाच्या स्ट्रक्चरला धोका पोहचू नये याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
-विवेक वडे, उप सरपंच ,खैरापाडा ग्रामपंचायत
उड्डाण पुलाच्या भींतीवर उगवलेली झाडे कापण्यात येवून पुन्हा अशी झाडे उगवू नयेत म्हणून योग्य ती कार्यवाही केली जाईल व तशी खबरदारीही घेण्यात येईल.
- चंद्रकांत भगत , उपअभियंता, एमआयडीसी,
पुलाचे बांधकाम २००३ च्या सुमारास पूर्ण होऊन वाहतुकीस खुला करून आठ दिवस उलटत नाही तो पर्यंत पुलावरील मोठा भाग खचला होता ही गंभीर बाब त्या वेळी लोकमतने प्रसिद्ध करून पुलाच्या बांधकामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाला होता अखेर पुलाच्या बांधकामाच्या तांत्रिक तपासणीत दोषी आढळलेल्या एमआयडीसीच्या दोन अधिकाºयांना तडकाफडकी निलंबित केले होते त्यामुळे या पुलाची सुरवातच वादग्रस्त झाली होती.