गोठणपूरच्या दांडेकर मैदानात आदिवासींचे बिऱ्हाड
By admin | Published: May 10, 2016 01:49 AM2016-05-10T01:49:02+5:302016-05-10T01:49:02+5:30
गोठणपूर भागातल्या दांडेकर मैदानात मोखाडा, विक्रमगड व जव्हार अशा खेडोपाड्यातून शेकडो आदिवासी कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झालेले असून ते संपूर्णत
निखिल मिस्त्री, पालघर/नंडोर
गोठणपूर भागातल्या दांडेकर मैदानात मोखाडा, विक्रमगड व जव्हार अशा खेडोपाड्यातून शेकडो आदिवासी कुटुंबीय पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झालेले असून ते संपूर्णत: पुन्हा एकदा झोपडीमय झाले आहे. हे स्थलांतरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे. पण यावर्षी मात्र स्थलांतरीतांचा आकडा वाढला आहे.
ही शेकडो कुटुंबे आपल्या पोराबाळांच्या शिक्षणाची फिकीर न करता रोजगार मिळविण्यासाठी इथे येतात . मजुरी, नाका कामगार, बिगारी, वाडीची कामे, बांधकाम व्यावसायिकांकडे नानातऱ्हेची कामे करतात. भुकेलेल्या पोटाकडे न बघता दिवसभर कडाक्याच्या उन्हात हे लोक काम करीत असतात. आजही रोजगारासाठी स्थलांतर झालेले हे लोक पूर्ण दिवस खपून २०० ते ३०० रुपये प्रतिदिन कमवतात गावातल्या उपासमार करणाऱ्या बेकारीपेक्षा शहरातील तुटपुंजी मजुरी बरी असे हे लोक म्हणत आहेत.
या कुटुंबातील मुले-मुली शिक्षण सोडून पडेल ती कामे करून घर खर्चाला हातभार लावत असतात. ज्या लोकांनी मनरेगा अंतर्गत कामे केली आहेत, अशांना अजूनही मजुरीच मिळाली नाही. म्हणून हे लोक अशा योजनांची आस न करता पोटची खळगी भरण्यासाठी आपली घरे-दारे बंद करून दोन पैसे मिळतील या आशेने शहरी भागात स्थलांतरण करून राहतात.