स्वतंत्र ग्रामपंचायतींची आदिवासींची मागणी
By admin | Published: December 8, 2015 12:22 AM2015-12-08T00:22:15+5:302015-12-08T00:22:15+5:30
डहाणू तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असून ४० वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे विभाजनच झाले नसल्याने ग्रामीण
कासा : डहाणू तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असून ४० वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे विभाजनच झाले नसल्याने ग्रामीण भागात विकासकामांवर मर्यादा येत आहेत. वारंवार मागणी करूनही शासनस्तरावर त्याची दखल घेतली जात नाही.
तालुक्यातील १. कासा ग्रामपंचायतीत कासा, भिसेनगर, घोळ व भराड गावांचा समावेश आहे. २. उर्से ग्रामपंचायत - उर्से, म्हसाड, आंबिस्ते, साये या चार गावांचा समावेश आहे. ३. तवा ग्रामपंचायत - तवा, कोल्हाण, धामटणे, पेठ ही चार गावे समाविष्ट आहेत. ४. महालक्ष्मी ग्रामपंचायत - महालक्ष्मी, आंवढाणी, सोनाळे, खाणीव ही चार गावे आहेत. ५. सारणी ग्रामपंचायतीत सारणी, आंबिवली व निकावली ही तीन गावे समाविष्ट आहेत. ६. ओसरवीरा ग्रामपंचायतीत ओसरवीरा, दहयाळे, कांदरवाडी ही तीन गावे येतात. ७. वेती ग्रामपंचायतीत - वेती, वरोती व सूर्यानगर ही तीन गावे समाविष्ट आहेत. ८. मुरबाड ग्रामपंचायतीत - मुरबाड, वांगर्जे व पिंपळशेत ही तीन गावे समाविष्ट आहेत. तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतींत अशी तीन ते चार गावे मिळून आहेत.
आता प्रत्येक ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५ हजारांच्या जवळपास काही ग्रामपंचायतींची लोकसंख्या तर १० हजारांपर्यंत आहे. ग्रुपग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट गावे परस्परांपासून दूर आहेत. तर ग्रा.पं. कार्यालय एकाच गावी असल्याने काही गावांना ५ ते ८ कि.मी. अंतर कापून येथे यावे लागते. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. तसेच विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना मिळत नाही. तसेच ग्रामसेवक व सरपंच वेळोवेळी कार्यालयात येत नसल्याने विविध दाखल्यांस अनेक हेलपाटे मारावे लागतात. तसेच विकासकामांवरही मर्यादा येतात. (वार्ताहर)